कळवण:उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे कुलदैवत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. गडाच्या शिखरावर चार एप्रिल रोजी कीर्तिध्वज फडकविला जाणार आहे. चैत्रोत्सव सहा एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
चैत्रोत्सव यात्रेच्या नियोजनासाठी शासकीय, अशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विश्वस्त संस्थेच्या विविध विभागांची बैठक कळवणचे सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत विविध विभागांचे तालुका, जिल्हा व विभागस्तरावरील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आदींसह चर्चा करण्यात आली. तहसीलदार कापसे यांनी भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचना केली. शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी यात्रेसंदर्भात केलेल्या नियोजनाची माहितीसंदर्भातील तपशील सादर केले. यावेळी कळवण पोलीस निरीक्षक समाधान नांगरे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड, वन परीमंडळ अधिकरी धनराज बागुल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, सप्तशृंगगडचे सरपंच रमेश पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>नाशिक: आम्ही देखील रामभक्त; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
चैत्रोत्सवात गडाच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकविला जातो. चार एप्रिल रोजी कीर्तिध्वजाचे विधिवत पूजन होऊन गवळी परिवारातील प्रतिनिधींच्या माध्यमातून शिखरावर रात्री ध्वज फडकविण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली. समुद्रसपाटीपासून सप्तश्रृंग गड चार हजार ५६९ फूट उंचीवर आहे. वर्षभरातून दोनवेळा कीर्तिध्वज सप्तशृंग गडाच्या शिखरावर फडकवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री आणि नवरात्रोत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवा ध्वज शिखरावर फडकावला जातो. दरेगावचे गवळी पाटील सप्तशिखरांचा सुळका चढून ध्वज फडकवितात. त्याआधी कीर्तिध्वजाची गडावर मिरवणूक काढली जाते. चैत्रोत्सवानिमित्त गडावर भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.