लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख नोंदी सापडल्या असून त्या ऑनलाईन संकेतस्थळावर समाविष्ट करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शासकीय दस्तावेज पडताळणीत ३० हजार मोडी लिपीतील नोंदी आढळल्या. त्यांच्या पडताळणीसाठी प्रथम भाषांतर करावे लागणार आहे. विहित मुदतीत मोडी वाचकांच्या मदतीने हे काम पूर्णत्वास नेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
अलीकडेच शिंदे समितीचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शोध मोहिमेत मोडी आणि उर्दू भाषेतील नोंदी मराठीत भाषांतरीत करण्याचा विषय मांडला गेला होता. संबंधित वाचकांना मानधन, कुणबी नोंदी स्कॅन करून त्या संकेत स्थळावर समाविष्ट करण्यात निधीची कमतरता देखील मांडली गेली होती. समितीने इतर लिपीतील नोंदीबाबत संबंधित भाषा जाणकारांची मदत घ्यावी आणि आठ डिसेंबरपर्यंत जिल्ह्याचा अहवाल समितीकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहे.
आणखी वाचा-अबब…५५ हजार रुपये घरपट्टी धारकाला २७ लाखाची नोटीस, अवाजवी मालमत्ता कर नोटिसांमुळे धुळेकर हैराण
या पार्श्वभूमीवर, नोंदणी शोधणे व ऑनलाईन समाविष्ट करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत पावणेदोन कोटी नोंदींची पडताळणी केली गेली आहे. त्यात एक लाख ९९ हजार ५४ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये महसूल अभिलेखात ११२, जन्म-मृत्यू नोंदीत एक लाख ३८ हजार ८३२, शैक्षणिक अभिलेखात ३२ हजार ३७३, भूमि अभिलेख विभागाकडील अभिलेखात १२४ आणि अन्य अभिलेखात २७ हजार ६१३ कुणबी नोंदींचा समावेश आहे. अनेक ठिकाणी नोंदी शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नोंदी आढळलेल्या कागदपत्रांचे स्कॅनिंग सुरू आहे. ही कागदपत्रे डिजिटल स्वरुपात जतन केली जातील.
सर्वात जुनी नोंद १८४३ सालातील
या मोहिमेत अनेक जुन्या कुणबी नोंदी सापडत आहेत. नांदगाव तहसीलदारांना १८४३ सालातील कुणबीची सर्वात जुनी नोंद कुळ नोंदवहीत मिळाली. येवला तालुक्यातील एका शाळेत १८६३ साली शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कुणबी नोंद आढळली. जिल्ह्यातील मोडी लिपीच्या ३० हजार अभिलेखांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यातही काही जुन्या नोंदी सापडण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-शाळा, महाविद्यालयांबाहेर टवाळकी करणाऱ्यांनो सावधान, धुळे पोलीस अधीक्षकांची विशेष मोहीम
सिन्नर तहसील कार्यालयात १८९६ सालातील क-पत्रकात तर १९४८ सालच्या नमुना दोन हक्क नोंद पत्रकात कुणबी नोंद आढळली. नांदगाव तहसील कार्यालयात १८४३ सालच्या कुळ नोंदवहीत मोडी व मराठी भाषेतील कुणबी नोंद होती. याच तालुक्यात जन्म-मृत्यू नोंद वहीत (गाव नमुना १४) मध्येही ही नोंद सापडली. येवला तालुक्यात १८६३, १९०१, १९२७ या तीन सालात मोडी व मराठी भाषेत नोंदी सापडल्या. शिंदे समितीसमोर या संदर्भातील अहवाल प्रशासनाकडून सादर झाला होता. मोडी लिपीतील नोंदी पडताळणीसाठी या भाषेचे ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
लवकरच लिंकद्वारे तपासण्याची व्यवस्था
आपली कुणबीची नोंद आहे की नाही, हे तपासण्यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांसाठी एक लिंक उपलब्ध करणार आहे. या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना आपली नोंद शोधता येईल. तशी नोंद सापडल्यास त्या पुराव्याच्या आधारे संबंधित नागरिक कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज करू शकणार आहेत.