लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसमोर उमेदवारी न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंड थंड करण्यासाठी २० आणि २१ एप्रिलला शरद पवार दौऱ्यावर येत आहेत. ठाकरे गटाकडूनही चौधरी यांची समजूत काढली जाणार आहे.
रावेर मतदारसंघात भाजपतर्फे शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली. दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाच्या वाट्याला आलेल्या रावेर मतदारसंघात महिनाभर चर्चेचे गुर्हाळ सुरू होते. एकनाथ खडसेंनी वारंवार रावेर लोकसभा आपणच लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शरद पवार गटाकडून खडसे हे उमेदवार राहतील, असे मानण्यात येत होते. परंतु, रक्षा खडसे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यावर एकनाथ खडसेंनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले. त्यांची कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनीही नकार दिला. दरम्यानच्या काळात स्वतः खडसेंनी भाजपप्रवेश करणार असल्याची घोषणा केली.
आणखी वाचा-राज्यात महायुतीमध्ये बंडखोरी अशक्य – केशव उपाध्ये यांना विश्वास
खडसेंच्या भूमिकेमुळे रावेर मतदारसंघात शरद पवार गटाला ऐनवेळी उमेदवाराचा शोध घेण्याचा प्रसंग आला. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, मुक्ताईनगर येथील मक्तेदार विनोद सोनवणे यांची नावे पुढे आली. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील व माजी आमदार चौधरी यांनी मतदारसंघात प्रचारही सुरू केला. त्यानंतर अचानक रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव चर्चेत आले. त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे माजी आमदार चौधरी यांच्या दोनशेपेक्षा अधिक समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामे पाठविले. माजी आमदार चौधरींनी २४ एप्रिलला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले. शरद पवार हे मतदारसंघात उमेदवार बदलतील आणि आपणास उमेदवारी घोषित करतील, अशी अपेक्षा असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
आणखी वाचा-मनमाडकरांना दिलासा- आता १७ दिवसांआड पाणी
शरद पवार हे २० एप्रिल रोजी दिंडोरी येथील सभा आटोपून सायंकाळी साडेपाचला चोपडा येथे सभा घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला जामनेर, तर दुपारी एकला ते रावेर येथे मेळावा घेतील. त्यानंतर दुपारी तीनला वर्धा येथे रवाना होतील. मतदारसंघात चौधरींचे नेतृत्व मानणारा मोठा वर्ग असून, त्यामुळे त्यांचे बंड हे पक्षाला महागात पडण्याची शक्यता आहे. शरद पवार हे जिल्हा दौर्यावेळी चौधरींची भेट घेऊन चर्चा करतील, अशी शक्यता आहे.