धार्मिक पगडा, रूढी-परंपरेची प्रशासनासमोर समस्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम एक नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेच्या शंभर टक्के यशस्वीतेसाठी सुयोग्य नियोजन करून त्याची प्रभावी अमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी दिले आहेत.

गुरूवारी सकाळी जिल्हास्तरीय समन्वय समितीने आयोजित केलेल्या दूकश्राव्य बैठकीत त्यांनी मार्गदर्शन के ले. धार्मिक पगडा, रुढी परंपरेमुळे मालेगावमध्ये बालकांना लसीकरण करून घेण्यास कुटुंबिय तयार नसतात. त्यामुळे मालेगाव शहर आणि तालुक्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

बैठकीत जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, निवासी  वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नांदापूरकर, वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. मोहम्मद अब्दुल हाजिम अझहर, मालेगांव महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे आदींनी सहभाग घेतला. उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा हा तिसरा टप्पा आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य यंत्रणा, पोलिओ केंद्र कर्मचारी, अंगणवाडी आणि आशा कर्मचारी यांनी योग्य समन्वय ठेवणे गरजेचे आहे. करोनाच्या नियमांचे पालन करून प्रत्येक पोलिओ लसीकरण केंद्रात एकाच वेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन, सुरक्षित अंतराचे पालन करावे. केंद्रावर मुखपट्टी, हातांच्या स्वच्छतेसाठी द्रवरूप साबण, सॅनिटायझर यांची पुरेशी व्यवस्था ठेवावी, अशी सूचना अंतुर्लीकर यांनी के ली. डॉ. नांदापूरकर यांनी या मोहिमेची माहिती दिली. भारतात करोना विषाणूचा प्रसार हा अन्य देशातून झाला आहे. त्याचप्रमाणे पोलिओचे प्रमाण पाकिस्तान, अफगाणिस्थान या देशात जास्त प्रमाणात असून या देशातून भारतात याचा शिरकाव होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पोलिओचे समूळ निर्मूलन करणे हाच या पोलीओ लसीकरण मोहिमेचा उद्देश आहे. भारताच्या तिन्ही सिमारेषेंवरही वैद्यकीय पथके तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या मोहिमेत मालेगाव तालुका, मालेगांव मनपा कार्यक्षेत्रातील शून्य ते पाच वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मालेगाव शहरात बहुतेक नागरिक हे धार्मिक रूढी, योग्य माहितीच्या अभावामुळे बालकांना लसीकरण करून घेण्यास तयार होत नाहीत.  त्यामुळे प्रबोधन होणे गरजेचे असून धर्मगुरूंमार्फत प्रबोधन झाल्यास ही मोहीम प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास डॉ. नांदापूरकर यांनी व्यक्त केला.

व्यापक जनजागृती केल्याचा दावा

मालेगाव तालुका, मालेगाव महानगरपालिका यांचा या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी  मालेगांव महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अलका भावसार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही मोहीम पोहचविण्याच्या दृष्टीने पथकांद्वारे घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आल्याचे सांगितले. अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांना देखील या मोहिमेत सहभागी करून घरोघरी  भेटींद्वारे नवजात बालकांच्या जन्मांची नोंदणी करण्यात आली आहे  फलक, भित्तीपत्रकाद्वारे लसीकरण मोहिमेची जनजागृती करण्यात असल्याचे डॉ. भावसार यांनी सांगितले.