नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळा नियोजनासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींनी वेग घेतला आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा तुलनात्मक अभ्यास होत असतांना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा हा वेगळा ठरतो. हे वेगळेपण लक्षात घेता त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने कुंभमेळ्यासाठी प्राप्त निधी, उपलब्ध वेळ, दैनंदिन कामात भेडसावणारी तरंगती गर्दी, मूलभूत सुविधांचा अभाव आदी प्रश्नांवर भर देतांना नियोजन करण्यात येत आहे.
२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरत आहे. त्र्यंबक शहर अवघ्या १३.८५ चौरस किलोमीटरमध्ये वसले असून शहराची लोकसंख्या १५ लाखापेक्षा अधिक आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या धार्मिक विधींसाठी देशातून तसेच परदेशातून येणाऱ्या भाविकांची दैनंदिन संख्या ३० हजारापेक्षा अधिक आहे. शहराची आर्थिक वाहिनी मुख्यत: धार्मिक पर्यटनावर अवलंबून आहे.
शहरात बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा व्यतिरिक्त संत निवृत्तीनाथ महाराज पौष वारी, महाशिवरात्र उत्सव, गोदावरी जन्मोत्सव यांना विशेष महत्व आहे. प्रशासकीय पातळीवर या सण, उत्सवांसह दैनंदिन तरंगती गर्दी लक्षात घेत कुंभमेळ्याचे नियोजन करण्याचे आव्हान आहे. आगामी कुंभमेळ्याच्या तारखा लक्षात घेता पाऊस, त्यामुळे उद्भवणारी पूरस्थिती, दाट वस्ती, अरूंद रस्ते, वाढती खासगी वाहनांची संख्या यासह पायाभूत सुविधांचा अभाव या संकटांवर मात करावी लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रा्च्या विकासासाठी ११३८ कोटींच्या आराखड्यास लवकरच मान्यता दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दोन टप्प्यात या ठिकाणी कामे करण्याचे नियोजित आहे. पहिला टप्पा सिंहस्थापर्यंत पूर्ण केला जाईल. आणि उर्वरित काही कामे नंतर होतील. आराखड्यात दर्शनपथ, कुशावर्तसह विविध कुंड आणि प्रमुख मंदिरांचा जीर्णोद्धार, वाहनतळ, घाटांचे नुतनीकरण, वाढीव पाणी पुरवठा योजना आदींचा समावेश आहे. कुशावर्त तीर्थातील पाणी स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वरमधील रोजची तरंगती गर्दी आणि कुंभमेळ्यासाठी होणारी गर्दी याची सरमिसळ होऊ नये, यासाठी दर्शन पथ तयार करत ही गर्दी विभागण्यात येईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वाहनतळ यावर काम सुरू असून भाविकांची कमीतकमी पायपीट व्हावी, वाहनांमुळे एरवी होणारी वाहतूक कोंडी होऊ नये, यावर काम करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात दर्शनपथ मार्गिकेतंर्गत दर्शनाच्या प्रक्रियेला सुटसुटीत आणि सोयीस्कर करण्यासाठी प्रतिक्षागृहे, स्वतंत्र पादचारी मार्ग, बेसाल्ट फ्लोरिंग, वाहनतळ आणि स्वागत इमारत, मुख्य रस्त्यावर स्वागत कमान, शोभेचे पथदीप आदी कामे होणार आहे.