लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: अदानी उद्योग समुहाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे बोलले त्यात तथ्य आहे. हिडनबर्गसारख्या व्यवस्थांवर आपण विश्वास ठेवणार का, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांनी राष्ट्र म्हणून भूमिका घेतली असून काँग्रेसने निव्वळ करायचे म्हणून आरोप केल्याचा ठपका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठेवला.
शनिवारी सातपूर येथील बस स्थानकाचे लोकार्पण बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून केल्या जाणाऱ्या टिकेचाही त्यांनी समाचार घेतला. शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे ठाकरे गट म्हणजे किंचित सेना आहे. किंचित सेनेने विरोध करण्याचे काही कारण नाही. ठाकरे गटानेही जायला पाहिजे आणि आम्ही पण जातो. अयोध्येत राम मंदिर उभारणीचे शेकडो वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्यांचा सन्मान करायला हवा, असे त्यांनी सूचित केले.
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असून २०२४ पर्यंत विरोधकांना आणखी हादरे बसतील. इव्हीएम यंत्राबाबत व्यक्त होणाऱ्या साशंकतेबद्दल त्यांनी विरोधकांच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले. जेव्हा ते निवडून आले, तेव्हा इव्हीएम खराब नसतात. आम्ही निवडून आले की खराब असतात. विरोधकांवर कारवाई झाली की ते चुकीचे. त्यांच्या बाजूने निकाल आले तर लोकशाही जिवंत अन् आमच्या बाजूने आला तर टीका, अशी संबंधितांची कार्यपध्दती असल्याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले. महानगरपालिका निवडणुकीत मनसेशी युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते घेतील, असेही त्यांनी सांगितले.