चारुशीला कुलकर्णी
कोणतेही नाटक कलाकारांचा अभिनय, संगीत, नेपथ्य, विषय आदी घटकांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहते. परंतु, नाटकाची संहिता ही नाटक असो किंवा एकांकिका यासाठी महत्त्वाचा गाभा ठरते. संहिता दमदार असली तर नाटक कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते. उत्कृष्ठ संहितेचा शोध घेताना दिग्दर्शकाची दमछाक होत असते. नाट्यक्षेत्राची ही गरज लक्षात घेत येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने संहिता पेढी सुरू करण्यात आली आहे. या पेढीचा आजपर्यंत तीन हजारांहून अधिक जणांनी लाभ घेतला आहे.
नाट्यप्रेमी नाशिककर सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत राहतात. एखाद्या नाटकास यश न मिळाल्यास अनेकदा संहितेत दम नव्हता, असे कारण पुढे केले जाते. चांगल्या संहितेचे महत्त्व ओळखून ही अडचण दूर करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. संहिता पेढी ही अनोखी संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. २००६ मध्ये ही पेढी सुरू करण्यात आल्यावर तत्कालीन नगरसेवक शाहु खैरे यांनी पेढीसाठी दोन कपाटे भेट दिली होती. या पेढीत मेनली ॲम्युचर संस्थेच्या वतीने २०० हून अधिक संहिता भेट स्वरूपात देण्यात आल्या. सद्यस्थितीत पेढीत विजय तेंडुलकर, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यासह अनेक नवोदित लेखकांच्या संहिता आहेत.
नाट्य परिषदेचे सदस्य ज्या ठिकाणी परीक्षक म्हणून जातात. त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या संहितेची एक प्रत ही पेढीत जमा केली जाते. याशिवाय नाट्य परिषदेकडून नाट्य अभिवाचनाचे कार्यक्रम होतात. अशा कार्यक्रमातील संबंधित लेखकांकडूनही संहिता मिळवली जाते. यामुळे सध्या पेढीत ४०० हून अधिक एकांकिका आणि नाटकांच्या संहिता आहेत. मागील दोन वर्ष करोना संसर्गामुळे पेढीचे काम थंडावले होते. निर्बंध दूर होताच हे काम नव्याने सुरू झाले आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक जणांनी पेढीतील संहितांचा लाभ घेतला असल्याची माहिती परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.
संहिता पेढीची पार्श्वभूमी
नाशिक येथील मेनली ॲम्युचर संस्थेच्या वतीने प्रा. रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली २००३ मध्ये शहरात पहिल्यांदा संहिता पेढी सुरू करण्यात आली होती. ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या हस्ते पेढीचे उद्घाटन करण्यात आले होते. रंगकर्मी विनोद राठोड आणि अन्य सहकारी या पेढीचे काम पाहत होते. बाल नाटकांवर या माध्यमातून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पुस्तिका छापत नाटिका विद्यार्थ्यांना दिल्या जात होत्या. तीन वर्षानंतर हे काम थंडावले. प्रा. कदम नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष झाल्यानंतर परिषदेच्या वतीने पेढी सुरू करण्यात आली.