लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: राज्यभरातील रस्ते, वाडया, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबतचा निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला असून यामुळे सामाजिक बदलांची सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात २९०० हून अधिक जातीवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.

या प्रक्रियेत नाशिक विभागाचे काम समाधानकारक असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात विभागीय दक्षता व नियंत्रण समिती, महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या विभागीय समितीची बैठक व तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ व इतर अनुषंगिक विषयांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी गमे यांनी मार्गदर्शन केले. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातील २९०४ जातीवाचक नावे बदलण्यात आली असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील १६९ ,नगरपालिका क्षेत्रातील २६६, ग्रामपंचायत क्षेत्रातील (ग्रामीण) २४६९ याप्रमाणे बदलण्यात आली आहे.

तृतीयपंथी कल्याण समितीच्या बैठकीत तृतीयपंथीयांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी उपाय योजना करण्याचे आणि त्यांच्यासाठी ओळखपत्र वाटप करण्यासाठी शिबिर आयोजित करण्याचे निर्देश आयुक्त गमे यांनी दिले. दक्षता आणि नियंत्रण समितीच्या गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील त्याबाबत जिल्हावार आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने अत्याचारग्रस्तांना देण्यात आलेले अर्थसहाय आणि केलेल्या उपाययोजना याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे गमे यांनी सूचित केले. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुषंगाने समाज कल्याण विभागाने व्यापक स्तरावर जनजागृतीसाठी मोहीम हाती घ्यावी. जास्तीत जास्त समाज घटकांचा त्यात समावेश करून जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीस नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, विभागातील सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक, विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्यासह विविध यंत्रणांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change in the caste name of 2904 wadas in the division in nashik mrj