लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : रामनवमीनंतर येणाऱ्या एकादशीला शहरातून रामरथ आणि गरूड रथ यांची रथयात्रा काढली जाते. त्यानुसार शुक्रवारी एकादशीनिमित्त रथयात्रा काढली जाणार असून रथयात्रेत सहभागी होण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने गोदाकाठ परिसरात उपस्थित राहात असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने रथ ज्या मार्गाने मार्गस्थ होईल, त्या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीराम रथ आणि गरूड रथ मिरवणूक वाहतुकीच्या अडथळ्याविना पार पडावी, यासाठी वाहतूक विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. श्रीराम रथ नदी ओलांडत नसल्याने तो गाडगे महाराज पुलाजवळ गरुड रथ येईपर्यंत थांबतो. गरुड रथ मेनरोडमार्गे गाडगे महाराज पुलाजवळ आल्यावर गरुड रथ पुढे आणि रामरथ मागे अशी रथयात्रा सुरु होते. रथयात्रा मार्गांवर वाहतूक बंद करण्यात आल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आणखी वाचा-नाशिक : मध्य प्रदेशातील संशयितास सातपूरमध्ये अटक
श्रीराम रथ मिरवणूक काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यापासून नागचौक-चरण पादुका चौक-लक्ष्मण झुला पूल-काट्यामारूती – गणेशवाडी रोड- आयुर्वेदिक रुग्णालय- गौरी पटांगण-म्हसोबा पटांगण- कपालेश्वर मंदिर- परशुराम पुरीया रस्त्याने मालवीय चौक-शनीचौक-आखाडा तालीम-काळाराम मंदिर उत्तर दरवाजा ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा अशी निघणार आहे. श्री गरूडरथ मिरवणूक श्रीरामरथाबरोबर पुढे मार्गस्थ होते. यामुळे शुक्रवारी दुपारी दोनपासून मिरवणूक संपेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.