मालेगाव: या वर्षापासून राज्य शासनाने केवळ एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे म्हणून योजनेच्या जनजागृतीसाठी कृषी विभागातर्फे प्रचार रथाचे प्रयोजन करण्यात आले आहे. नाशिकचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मालेगाव येथे या रथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
मालेगाव तालुक्यात २२ जुलैपर्यंत ५२९ कर्जदार आणि ३८६८३ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले असले तरी बहुसंख्य शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाही. पीक विमा अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै ही आहे. हा कालावधी कमी असल्यामुळे अर्ज करण्यासाठीची मुदत वाढवून द्यावी, असा सूर शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा… Video : नाशिक शहरात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार, हल्ल्यात एक जखमी
या पार्श्वभूमीवर विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रथाच्या माध्यमातून पीक विम्याची जनजागृती सुरु करण्यात आली आहे. हा रथ गावागावात नेत शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या रथाच्या शुभारंभाप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, मंडळ कृषी अधिकारी आर. के.अहिरे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी राजेंद्र अहिरे, बाजार समितीचे संचालक चंद्रकांत शेवाळे, माजी नगरसेवक नीलेश काकडे, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.