लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : लासलगाव शहरात गावठी बंदुकांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील दोन तरुणांना लासलगाव पोलिसांनी पाठलाग करुन विंचूर तीनपाटी परिसरात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन गावठी बंदुका, नऊ जिवंत काडतुसे आणि मोटार सायकल असा एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली.
आणखी वाचा-रविवारच्या पोलीस भरतीत ५४ उमेदवारांची उपस्थिती
लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटारसायकलने पहाटे पावणे तीनच्या सुमारास जात असताना पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. तत्काळ सहायक निरीक्षक भास्कर शिंदे आणि हवालदार सुजय बारगळ यांनी या दोघांचा पाठलाग करुन त्यांना विंचूर तीनपाटी येथे पकडले. अनिकेत मळेकर ( २२) आणि नामदेव ठेबे (२२) अशी या दोघांची नावे आहेत. दोघांकडे तीन देशी बंदुका आणि नऊ जिवंत काडतुसे आढळली. दोघांवर लासलगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ते शहरात कोणाला गावठी बंदुका विकणार होते, यापूर्वी त्यांनी शस्त्रे विकली काय, याची पोलीस चौकशी करत आहेत.