साडेचार वर्षांत प्रत्येकाच्या खिशातून दीड लाखांची लूट केली. परंतु, चौकीदाराने तुम्हाला त्याची भनकही लागू दिली नाही. नोकरी देतो सांगून तरुणाईला फसवलं आणि जीएसटीमधून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. नोटाबंदीने या देशाचे आर्थिक कंबरडे मोडले. यातून आजही देशातील जनता सावरलेली नाही, अशा शब्दात सरकारच्या कारभारावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सिन्नर येथील सभेत शरसंधान साधले.
मी खाणार नाही आणि खायला देणार नाही, असे सांगून तुम्हाला लुटण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मन की बात मध्ये ५६ एपिसोड झाले. परंतु ५६ इंचाची छाती कुठे दिसली नाही, अशी कोपरखळीही मुंडे यांनी केली.
महाराष्ट्राला बरबटून आणि ओरबाडून खाण्याचे काम भाजपाने केले असून आपल्या मंत्र्यांची सगळी पापे झाकण्याचे काम केले, असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
नाशिकचा नावलौकिक आदरणीय छगन भुजबळ यांच्यामुळे झाला आहे. अडीच वर्षे भुजबळ यांना छळले आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण केले गेले नाही असे सांगताना छगन भुजबळ दिल्लीपासून राज्यातील भाजपा नेत्यांना पुरून उरतील. कारण राष्ट्रवादीचे सैन्य त्यांच्यासोबत आहे. आम्ही मेलेल्या आईचे दुध प्यायलेलो नाही. सर्व शक्तीनिशी पुरुन ऊरु, असा इशाराही मुंडे यांनी जाहीर सभेत दिला.