जमीन खोदताना सापडलेली सोन्याची नाणी विकण्याचे आमिष दाखवून दोन जणांना १० लाख रुपयांना फसविण्यात आले. सुरगाणा तालुक्यात हा प्रकार घडला. पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दादरा नगर हवेलीतील सिल्वासा येथील मुकेश खोंडे (२६) यांनी सुरगाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. एक काळ्या रंगाची स्विफ्ट कारसह दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील कमलाकर गांगुर्डे (रा. वडपाडा) ,रमेश पवार (रा. मोकपाडा), सुरेश कनसे (रा. भोकरपाडा), रामदास मुडा, कांतीलाल पवार आणि स्विफ्ट कारमधून आलेले तसेच पोलीस असल्याचा बनाव करणाऱ्या चार जणांचा सहभाग आहे.
हेही वाचा >>>जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का, भाजपा उमेदवाराकडून मंदाकिनी खडसे यांचा पराभव
२९ नोव्हेंबर रोजी सहा ते साडेसातच्या दरम्यान सुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोन्याच्या नाण्यांचा १० लाखांत खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार होता. यावेळी पाच हजार रुपये इसार देऊन उर्वरित रक्कम नंतर देण्या-घेण्याबाबत बोलणे झाले होते. त्यानुसार ठरल्याप्रमाणे सिल्वासा येथील मुकेश खोंडे, नारायण गुज्जर आणि सोबत आलेले इतर हे १० लाख रुपये घेऊन ठरल्यावेळी सुळे रस्त्यालगत मोहाच्या झाडाजवळ पोहोचले. त्यांच्यात बोलणी सुरू असतानाच त्याठिकाणी काळ्या रंगाची स्विफ्ट कार आली. कारमधील चार जण तेथे आले. पोलीस असल्याचे सांगून छापा टाकल्याची बतावणी करीत पिस्तुलचा धाक दाखवून व मारण्याची धमकी देऊन खोंडे, गुज्जर यांचेकडील १० लाख रुपये बळजबरीने काढून घेतले. याप्रकरणी काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी रमेश पवार, कमलाकर गांगुर्डे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सुरगाणा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे केली.