नंदुरबार : देशभरात प्रसिध्द असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे अश्वनृत्य स्पर्धेने चेतक फेस्टिव्हलला सुरुवात झाली. घोड्यांच्या मनमोहक नृत्यांनी अश्वशौकिनांना चांगलीच भुरळ घातली. अश्वनृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात घोडे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्यातील घोडे बाजार आता ऐन रंगात आला असून बाजारातील चेतक फेस्टिव्हलचे उदघाटन झाले आहे. बाजारातील रेस मैदानावर काही जण घोड्यांसह करामती दाखवत असताना दुसरीकडे अश्वनृत्य स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या अश्वनृत्य स्पर्धेत देशभरातील १३ घोड्यांनी भाग घेतला. घोड्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थित स्तंभित झाले. दोन पायांवर उभे राहून सलामी, घोड्याचे नागीन नृत्य, खाटेवरचे नृत्य, यांना उपस्थित अश्वशौकिनांची चांगलीच दाद मिळाली. रंग, वेग, उंची, शुभखुणा ही वैशिष्ट्ये आकर्षक घोड्यांची मानली जातात. या मानकांबरोबर त्यांच्यातील नृत्याविष्कार ही घोड्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अश्वनृत्य स्पर्धेत घोड्यांनी सादर केलेल्या नृत्यांमुळे अनेकांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. कधी पारंपरिक ढोलाच्या तालावर तर, कधी पंजाबी भांगडा नृत्यावर, मध्येच हलगीची लय, अशा विविध तालात चेतक फेस्टिव्हलमधील अश्वनृत्य स्पर्धेत घोड्यांचे नाचकाम दिसून आले. कुठल्याही प्रकारचा लगामचा अडथळा नसताना फक्त आपल्या मालकाच्या इशाऱ्यावर परातीत, खाटेवर उभे राहत काही अश्वांनी नृत्य सादर केले.

हेही वाचा…बेशिस्तीविरोधात कारवाई, वाहतूक पोलिसांसह प्रादेशिक परिवहनची मोहीम

या घोड्यांना नृत्यासाठी तयार करण्याकरिता महिनाभर प्रशिक्षण दिले जाते. मालक घोड्याला मैदानात प्रशिक्षण देतात.अश्व सौंदर्य स्पर्धेसाठी तर मालक घोड्यांच्या नाचकामावर वर्षभराहुन अधिकची मेहनत घेतात. या अश्वनृत्य स्पर्धेत गुजरातहून आलेले प्रदीप यादव यांची माही घोडी विजेती ठरली. अमरावतीच्या शाहिक इम्रान यांचा राजू घोडा हा उपविजेता तर, अहमदाबाद येथील जितूभाई यांची तेंगली घोडी तिसरी, इंदूर येथील धनजंय भाई यांची काजोल चौथी तर बडोदा येथील मुश्ताक पठाण यांचा सूर्या घोडा पाचव्या क्रमांकावर राहिला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chetak festival began with horse dance competition at sarangkheda nandurbar renowned nationwide sud 02