नाशिक – नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षाच्या ज्ञानयज्ञास एक मे रोजी सायंकाळी सात वाजता गोदाकाठावरील देव मामलेदार पटांगणावर सुरुवात होत आहे. ३१ मेपर्यंत हा ज्ञानयज्ञ सुरू राहणार आहे. ज्ञानपीठप्राप्त कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो, युवा लेखक चेतन भगत, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई हे यंदाच्या व्याख्यानमालेचे आकर्षण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसंत व्याख्यानमाला शताब्दी वर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी शताब्दी वर्ष कार्यक्रमांची घोषणा केली. व्याख्यानमालेचा समारोप ३१ मे रोजी महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सादरीकरणाने होणार आहे. दोन मे रोजी लोकशाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. प्रकाश खांडगे यांच्या नेतृत्वाखालील यशराज कलापथकाचे रंग शाहिरीचे, पाच रोजी दक्षिण कोरियातील प्रा. रोहिदास आरोटे यांचे विज्ञानाशी जडले नाते, सहा रोजी पुणे येथील प्रसाद सेवेकरी यांचे आपत्ती व्यवस्थापन, मानवतावाद आणि आपण या विषयावर व्याख्यान होईल. सात रोजी नवी दिल्ली येथील डॉ. रमण गंगाखेडकर यांचे भारताचा करोनाविरुद्धचा लढा, आठ रोजी माऊंट अबू येथील ब्रह्माकुमारी संतोष दिदी यांचे आध्यात्मिक ज्ञानद्वारा जीवन मे सुख शांती की प्राप्ती, नऊ रोजी स्वीडन येथील ज्येष्ठ लेखक इश्तियाक अहमद यांचे जत्रेत हरवलेल्या दोन भावांची कथा – भारत-पाकिस्तान आणि त्यांचे वेगवेगळे, सामाजिक-राजकीय मार्ग आणि त्यांनी एकमेकांशी कसे वागावे, एक सूचना या विषयावर व्याख्यान होणार आहे.

हेही वाचा – जळगाव : तलाठ्यासह कोतवाल लाच घेताना जाळ्यात

व्याख्यानमालेत १० रोजी नागपूर येथील कृषितज्ज्ञ सी. डी. मायी यांचे भविष्यातील भारतीय शेती, ११ रोजी दुबई येथील सचिन व श्रिया जोशी यांचा प्रवास एका अन्नपूर्णेचा, १२ रोजी पुणे येथील साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे प्रशासनाकडून जनतेच्या अपेक्षा, १३ रोजी पुणे येथील अनुरूप विवाह संस्थेच्या डॉ. गौरी कानिटकर यांचे विवाह संस्थेचे बदलते स्वरूप, १४ रोजी शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांचे शिवशंभू : पितापुत्रांचे अविस्मरणीय भावबंध, १५ रोजी ज्ञानपीठकार गोवा येथील दामोदर मावजो यांचे श्रेयस की प्रेयस, १६ रोजी लंडन येथील माधवी आमडेकर यांचे विद्यमान शैक्षणिक व्यवस्था आणि भवितव्य, १७ रोजी तेलंगणा येथील विशेष पोलीस महानिरीक्षक महेश भागवत यांचे स्पर्धा परीक्षा आणि महाराष्ट्रातील युवक, १८ रोजी अमेरिका येथील ॲड. नितीन जोशी यांचे अमेरिकेतील मराठी समाज, काल-आज-उद्या याबाबत प्रकट मुलाखत होईल.

हेही वाचा – जळगाव : भुसावळच्या दोन तरुणांवर गोळीबार; तीन संशयितांना अटक

१९ रोजी अमेरिका येथील डॉ. रवी गोडसे यांचे वैद्यक शास्त्रातील विनोद, २० रोजी मुंबई येथील कॅप्टन नीलम इंगळे यांचे नभांगण या विषयावर व्याख्यान होईल. २१ रोजी फ्रान्स येथील अमित केवल यांचे वाइन ॲट नाईन – भारतीय वाइन उद्योगाला आकार देणारे नऊ बदल, २३ रोजी अमेरिका येथील डॉ. चंद्रशेखर चव्हाण यांचे नेत्र आणि दृष्टी, २४ रोजी जर्मनी येथील भरत गिते यांचे मेक इन इंडिया – पायाभूत सुविधा क्षेत्र, २५ रोजी नागपूर येथील लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांचे महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागातील नागरीक शेजारच्या राज्यांच्या प्रेमात का ?, २६ रोजी नवी दिल्ली येथील ज्ञानेश्वर मुळे यांचे देशविदेशातील अद्भुत अनुभव, २७ रोजी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे भारतातील सद्य राजकीय स्थिती. २८ रोजी ठाणे येथील प्रा. धनश्री लेले यांचे महाकवी सावरकर, २९ रोजी अमेरिका येथील विद्या जोशी यांचे भारताबाहेरील भारत या विषयावर व्याख्यान होईल. व्याख्यानमालेचा समारोप ३१ मे रोजी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने होईल.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chetan bhagat rajdeep sardesai damodar mawjo are the highlights of this year vasant vyakhyanmala in nashik ssb
Show comments