नाशिक – शिवसेना पक्ष १९९१ मध्ये फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवार यांनीच केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. मी शिवसेना फोडू शकत नव्हतो. ३६ लोकांची स्वाक्षरी झाल्यानंतर मी शेवटी गेलो, असा दावा त्यांनी केला.राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येवला मतदार संघात महायुतीच्या प्रचार सभेत भुजबळ यांच्यावर फसवणूक, धोकेबाजीचे आरोप केले. या आरोपांना भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. राज्याचा मुख्यमंत्री केल्यावर एखादा नेता वरचढ होऊन जातो. हा अनुभव गाठिशी असल्याने २००४ मध्ये शरद पवार यांनी आपल्यालाच काय, पण आर. आर. पाटील, अजित पवार यांनाही मुख्यमंत्री केले नाही, याकडे लक्ष वेधले.
कुठलाही दोष नसताना तेलगी प्रकरणात आपणास गोवण्यात आले. अधिकाऱ्यांमधील वाद होते. मला राजीनामा द्यायला लावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपणास नगरसेवक, महापौर केल्याबद्दल मी अनेकदा आभार मानले आहेत. बाळासाहेब माझी टिंगल करीत होते. तेव्हा काही काळ मी भांडलो. परंतु, नंतर जाऊन त्यांना भेटलो. काँग्रेसने पवारांना बाजुला केले, तेव्हा भुजबळ हा पहिला माणूस त्यांच्याबरोबर होता. आपण संघर्ष केल्यामुळे आपणास पदे दिली गेली. पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात नेण्याबाबत पवार यांनी कधीही काहीच केले नसल्याची टीका भुजबळांनी केली. भाजप, काँग्रेस, शिवसेनेला काही विचारधारा आहेत. परंतु, राष्ट्रवादीची विचारधारा काय, असा प्रश्न त्यांनी केला. राज्यात विविध भागात स्थानिक पातळीवर मजबुतीने काम करणाऱ्या मंडळींच्या बळावर पक्ष कार्यरत असल्याचे त्यांनी सूचित केले.