नाशिक : मंत्रिपद न मिळाल्याने संतप्त झालेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची पाऊले आता तिसऱ्या बंडाच्या दिशेने पडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात आपला समावेश केला नाही. पक्ष नेतृत्वाकडून अवहेलना झाली, अशी नाराजी व्यक्त करणाऱ्या भुजबळ यांनी प्रफुल पटेल यांच्यावर संताप व्यक्त केला. फडणवीस यांच्याविषयी ममत्व दाखवितानाच अजित पवार गटाच्या शीर्ष नेत्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या भुजबळ यांचा प्रवास आता भाजपच्या दिशेने सुरू झाल्याची चर्चा होत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने नाराज भुजबळ हे हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकला परतले. मंगळवारी त्यांनी ‘भुजबळ फार्म’ या निवासस्थानी तसेच येवला मतदारसंघात समर्थकांशी चर्चा केली. पाच ते सहा महिन्यांमधील घटनाक्रम मांडला. राज्यसभा, लोकसभा निवडणुकीचे संदर्भ देत राष्ट्रवादीच्या शीर्ष नेत्यांवर रोष प्रगट केला. ‘तुम्हाला आपण लहान मुलांचे खेळणे वाटतो का? तुम्ही उठ म्हटले की उठायचे आणि बस म्हटले की बसायचे? भुजबळ तसा मनुष्य नाही’, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना फटकारले.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची तयारी दर्शवल्यावर ऐनवेळी नेतृत्वाने कच खाल्ली. राज्यसभेसाठी इच्छुक असताना इतरांना संधी दिली. महाराष्ट्रात आपली गरज असल्याचे कारण देत विधानसभेत उमेदवारी करण्यास सांगितली. निवडून आल्यावर राज्यसभेवर जाण्यास सांगण्यात आल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. भुजबळ यांचा संताप पक्षाच्या मुख्य नेत्यांवर आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या मंत्रिपदासाठी अखेरपर्यंत आग्रही होते. अजित पवार यांनी मात्र त्यांचे ऐकले नाही, असे त्यांनी अप्रत्यक्ष सूचित केले.
पर्याय खुले करण्याची शक्यता
अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांवर ताशेरे ओढताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ममत्वभाव अधोरेखीत केला. यामुळे ते आता भाजपच्या गोटात दाखल होऊन महाराष्ट्र वा दिल्ली यापैकी कुठेही काम करण्याचे पर्याय खुले करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीतील ‘शीर्षस्थ’ नेत्यांवर छगन भुजबळ यांचे टीकास्त्र
नाशिकमधील पदाधिकारी आणि समर्थकांच्या बैठकीत कोणीही भाजपमध्ये प्रवेश करावा, असे सुचविले नाही. बुधवारी समता परिषद आणि राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. – छगन भुजबळ (माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गट)