लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचाही वेगळा पक्ष काढण्याचा विचार होता. नंतर मात्र त्यांनी तो विषय सोडून दिला, असा गौप्यस्फोट माजीमंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला. एखाद्या समाजावर आधारीत पक्ष कितपत यशदायी ठरेल, याविषयी भुजबळ यांनी साशंकता व्यक्त केली आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या इतकी मोठी आहे की, त्यांना एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील, असे विधान पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी उपरोक्त घटना कथन केली. मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे, इतकाच त्याचा अर्थ घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करण्याच्या भाजप आमदार सुरेश धस यांच्या मागणीवर भुजबळांनी टीका केली. अशी मागणी करणे चूक आहे. कोणत्याही समाजाची व्यक्ती असली तरी अशा घटनांकडे हत्येसारख्या दृष्टीने पाहिले पाहिजे. त्यास जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी दैवत, महापुरुषांच्या चित्रांसह संविधानाची पुन्हा छपाई करण्याच्या सूचनेला विरोध करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. उलट त्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची छायाचित्रे नसतील तर तीही समाविष्ट करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानाच्या संदर्भाने त्यांनी इतिहास बदलण्याचा मक्ता त्यांना कोणी दिला, असा प्रश्न केला. पुण्यातील भांडारकर संस्थेचे पदाधिकारी असल्याने हे विद्वान गृहस्थ असल्याची आपली धारणा होती. या लोकांनी मर्यादा पाळायला हवी. विवादास्पद विधाने करून सोलापूरकर रोष ओढवून घेत असल्याचे त्यांनी सूचित केले. शिवभोजन योजनेची राज्यात दोन हजार केंद्रे आहेत. त्या ठिकाणी दररोज दोन लाख लोक जेवण करतात. त्यांचा वर्षाचा खर्च २६९ कोटी आहे. त्यामुळे ही योजना बंद करू नये, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.