त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ राज्यात काढण्यात आलेल्या मोर्चांमध्ये हिंसाचार झाल्याच्या घटनेवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी हिंसाचारावरून भाजपावर निशाणा साधलाय. काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. विकासाची कामं हातात नाही, त्यामुळे हिंदू-मुस्लीम भांडणं लावली जात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. ते नाशिकमधील येवला येथे आढावा बैठक आणि विकास कामांच्या उद्घाटनानंतर पत्रकाराशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ म्हणाले, “काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. विकासाची कामं हातात नसले की हिंदू-मुस्लीम भांडणं लावून देणे यांचे काम आहे. अनेक राज्यात निवडणुका आलेल्या असल्याने हिंदू मुस्लिमानांमध्ये फूट पाडण्यासाठी असं कृत्य केलं जातंय.

“विलिनीकरणाची मागणी भाजपाच्या काळातही रद्द”

खासदार भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर दडपशाही करून निलंबन करत आहे, असा आरोप केलाय. याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यांची विलिनीकरण ही मागणी आहे. मात्र, ती पूर्ण होणार नसून भाजपाच्या काळात देखील मुनगंटीवार यांनी ही मागणी रद्द केली होती.”

“भाजपाचा मोर्चा शांततेने होईल अशी अपेक्षा होती, मात्र वेगळं वळण लागलं”

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “त्रिपुरा घटनेबाबत काल निवेदन देण्याच्या दृष्टिकोनातून परवानगी मागितली होती. ते निवेदन देऊन परत जाताना काही लोकांमुळे याला वेगळं वळण लागलं. भाजपाचा मोर्चा शांततेने होईल अशी अपेक्षा होती. मात्र वेगळं वळण लागलेलं आहे. पोलीस विभाग आवश्यक पावलं टाकत आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बोलत आहेत. राज्य महत्त्वाचे आहे. सर्वांनीच सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.”

हेही वाचा : “त्रिपुरात घटना घडते म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करणार असाल तर…”, अमरावती हिंसाचारावरून प्रविण दरेकरांचा इशारा

“मुस्लीम समाज आक्रमक झाला असं वक्तव्य करणे योग्य नाही. कुणी चिथावणी देत असेल तर कारवाई केली जाईल. संपूर्ण राज्यात शांतता आहे. घटना फक्त अमरावतीमध्ये घडत आहे. तेथील परिस्थिती थोड्या वेळेत नियंत्रणात येईल,” असंही दिलीप वळसे यांनी नमूद केलं.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal criticize bjp over violence in amravati over tripura incident pbs