नाशिक : फेसबुकवर थेट प्रक्षेपण करुन कोणी गोळीबार करत असेल, आपआपसातील भांडणात गोळीबार होत असेल तर, पोलीस काय करणार, अशा प्रकरणात गृहमंत्री काय करणार, असा प्रश्न उपस्थित करुन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचा बचाव केला. येथे शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ यांनी, दंगल, दोन गटात तेढ असेल, टोळीयुध्दाचा भडका असेल, गुन्हेगारी वाढली असेल तर पोलीस काही करू शकतात, असे सांगितले. प्रत्येकाला पोलीस संरक्षण देऊ शकत नाहीत. सोबत असलेलेच जर हल्ला चढवत असतील तर पोलीस काय करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा…नाशिक: मुख्यमंत्री मार्गस्थ अन् वीज गायब
मनोज जरांगे यांचा अभ्यास नसल्याने व्यर्थ बडबड करत आहेत. जरांगे यांना मंडल आयोग संपवायचा आहे. ओबीसी आरक्षण ही मंडल आयोगाची उत्पत्ती आहे. आयोग संपल्यास ओबीसी आरक्षणाचा मुद्दा येतो कुठे, मंडल आयोग संपल्यास ओबीसी आरक्षण राहील काय, याचा विचार करावा, अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला ओबीसीत मागच्या दाराने ते आरक्षण मागत आहेत. यावर आपला आक्षेप असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.