लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (इरिन) संस्थेत महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने अभ्यास केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
रेल्वे विभागाच्या नाशिक येथील इरिन संस्थेत विभागातील तंत्रज्ञांना कवच ४.० या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. हे भारताचे स्वयंचलित रेल्वे सुरक्षा तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय रेल्वे अधिक गतिमान व सुरक्षित होत आहे. आतापर्यंत रेल्वे विभागाच्या नऊ हजारपेक्षा जास्त तंत्रज्ञांनी इरिन येथे कवच तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय रेल्वेला सुरक्षा प्रदान करणाऱ्या संस्थेत देशातील असंख्य महिलांना सुरक्षेचे व सन्मानाचे जीवन देणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांच्या नावे अभ्यास केंद्र सुरू करणे हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान ठरेल, असे भुजबळ यांनी पत्रात नमूद केले आहे.