नाशिक – नदी स्वच्छता, साधुग्राम, पायाभूत सुविधा, रुग्णालय यासह विविध विकास कामांचा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ नियोजनात समावेश करण्यात यावा, अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना केली आहे. याबाबत संबंधितांना पत्र देण्यात आले आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यानिमित्त पाच कोटी भाविक, पर्यटक येणे अपेक्षित आहे. कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दळणवळण, परिवहन, पाणी पुरवठा, निवास, आरोग्य, विद्युत, कायदा व सुव्यवस्था, वाहनतळ इत्यादी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने नियोजन आणि त्याची प्रभावशाली अंमलबजावणी गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

गोदावरी स्वच्छतेसारख्या महत्वाच्या विषयाकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. गोदापात्रात शहर परिसरातील उद्योगांसह निवासी भागातील सांडपाणी मिसळत असल्याचे निदर्शनास येते. पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांमधूनही गोदावरीमध्ये सांडपाणी जाते. शहरातील प्रमुख ५० पैकी सुमारे २५ ठिकाणांवर सांडपाणी गोदावरीमध्ये सोडले जात आहे. हे गटारीचे सांडपाणी बंद करून भूमिगत गटारींना जोडले जावे. सिंहस्थामध्ये केवळ सांडपाणी प्रक्रिया केंद्राची संख्या वाढविणेच पुरेसे नाही. तर गोदापात्रात सांडपाणी सोडणारी केंद्रे त्वरित बंद करून गोदापात्रातील पाणी दुषित होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजनेचा सिंहस्थ आराखड्यामध्ये समावेश करावा. त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थमध्ये पाणी स्वच्छ करणारे यंत्र बसवावे. त्र्यंबकेश्वरमधून वाहणाऱ्या गोदावरीची स्वच्छता करण्यात यावी. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये तयार केलेले शहराच्या बाहेरील आणि शहरांतर्गत असलेल्या दोन्ही चक्री रस्त्यांचे रुंदीकरण करून सुधारणा करावी, अशा सूचना भुजबळ यांनी पत्रात केल्या आहेत.

प्रगती मैदानच्या धर्तीवर सुविधांची गरज

महानगरपालिकेच्या मालकीच्या साधुग्राम जागेवर प्रगती मैदानच्या धर्तीवर कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. साधुग्राममधील पाणीपुरवठा व्यवस्था, पथदीप, रस्ते, गटार, स्वच्छतागृहे आदी पायाभूत सुविधांचा ११ वर्षे विविध प्रदर्शने व समारंभासाठी वापर होईल. त्याच सुविधांचा एक वर्ष सिंहस्थासाठी वापर होईल. आरोग्यासाठी मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात वाढीव ५०० खाटांची व्यवस्था करणे, स्वतंत्र महिला पोलीस ठाणे, नाशिक रोड रेल्वे उड्डाणपूल पुनर्बांधणी, रेल्वे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प, प्रसाद योजनेतंर्गत त्र्यंबकेश्वर परिसराचा विकास, नाशिक अग्निशमन विभागाचे आधुनिकीकरण आणि उन्नतीकरण करणे, आदी सूचनाही भुजबळ यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

Story img Loader