नाशिक : शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दिंडोरी, देवळाली आणि इगतपुरी या राष्ट्रवादीतील (अजित पवार) उमेदवारांविरोधात हवाईमार्गे अखेरच्या क्षणी एबी अर्ज पाठविले होते. इगतपुरीतील त्यांचे उमेदवार मनसेत गेल्यामुळे त्या अर्जाचा उपयोग झाला नाही. नांदगावच्या निवडणुकीत उतरताना समीर भुजबळ यांनी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. घड्याळ चिन्ह त्यांना घेता आले असते. पण त्यांनी नैतिकता पाळली, असा दावा करुन छगन भुजबळ यांनी शिंदे गटाच्या कृतीला प्रत्युत्तर देत पुतण्याच्या बंडखोरीचे एकप्रकारे समर्थन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेने (एकनाथ शिंदे) हवाईमार्गे देवळालीत राजश्री अहिरराव आणि दिंडोरीतून धनराज महाले यांचे एबी अर्ज पाठवून राष्ट्रवादीला (अजित पवार) धक्का दिला. या घडामोडींवर छगन भुजबळ यांनी भाष्य करताना शिंदे गटाने एबी अर्ज का दिले, कशासाठी दिले, याविषयी वरिष्ठ नेते संबंधित पक्ष नेतृत्वाशी चर्चा करतील, असे सांगितले. या घटनाक्रमाचा संबंध नांदगावमधील समीर भुजबळ यांच्या बंडखोरीशी जोडला जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी समीर हे स्वतंत्र अपक्षपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. मध्यंतरी अजित पवार हे हिरामण खोसकर यांच्या कार्यक्रमाला आले होते. तेव्हा मित्रपक्षांकडून बंडखोरी होईल, अशी तक्रार खोसकर आणि नरहरी झिरवळ यांनी पवार यांच्याकडे केली होती. समीर भुजबळ यांना राजीनामा न दिल्यास पक्षातून काढून टाकावे लागेल, असेही सूचित करण्यात आले होते, याकडे काका भुजबळ यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा…नाशिकमध्ये पुन्हा नामसाधर्म्याचे डावपेच

महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. तिकीट न मिळाल्याने पक्षांतरे झाली. अपक्षही वाढले असून यावेळी निवडून येणाऱ्यांत त्यांची संख्याही चांगली राहील, असेही त्यांनी सूचित केले. निवडणुकीत मनोज जरांगे हा घटक राहिलेला नाही. विधानसभेत ज्या मतदारसंघात बोलावणे येईल, तिथे प्रचाराला जाणार असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal reply to shiv sena shinde faction after samir bhujbal resignation sud 02