नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने जिल्हा आणि राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची घोषणा करावी, तसेच राज्य आणि केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, अशी मागणी आ. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२६ मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. कुंभमेळा जवळ आला असतानाही प्रशासकीय पातळीवर तयारीच्या पातळीवर अद्याप सामसूम आहे. अवघ्या अडीच वर्षांवर येवून ठेपलेल्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता आतापासून तयारी केली तरच कुंभमेळ्यापर्यंत ही कामे पूर्ण होऊ शकतील, याकडे पत्राद्वारे भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांसाठी नाशिक महानगरपालिकेने आणि त्र्यंबकेश्वरमधील सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सिंहस्थामधील कामांचे सूक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची आवश्यकता असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>नाशिक: दुकान निरीक्षकास लाच स्विकारताना अटक

सिंहस्थ आराखड्यातील विविध कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. कुंभमेळ्यातील सर्वाधिक महत्वाचा प्रश्न साधुग्राम आणि अन्य विकास कामांसाठी भूसंपादनाचा असतो. यासाठी आतापासून नियोजन केले तरच भूसंपादन करून त्या ठिकाणी कामे करता येतील. सिंहस्थ तोंडावर आल्यानंतर घाईघाईत कामे केली तर त्या कामांना दर्जा राहत नाही. विकास कामे दर्जेदार आणि दिर्घकालीन होण्यासाठी ती विशिष्ट कालमर्यादेत होणे आवश्यक आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची लवकरात लवकर घोषणा करावी, राज्य व केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कामांबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही तातडीने व्हावी, अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.