विधान परिषद निवडणुकीत भाजपचे नागपूर व अमरावती हे बालेकिल्ले ढासळले. त्यामुळे कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीत अनेक मंत्री तिथे ठाण मांडून काळजी घेत आहेत. महापालिकेची निवडणूक स्थानिक प्रश्नांवर लढविली जाते. कुठल्या पक्षाचा कोण उमेदवार, आघाडी कशी आदींवर अनेक बाबी अवलंबून असतात. जमिनीवरील वास्तव वेगळे असते. उमेदवार २०० ते ५०० मतांनी निवडून येतो. त्यामुळे भाजपने नाशिक महापालिकेत १०० हून अधिक जागा जिंकण्याचे केलेले सुतोवाच निव्वळ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आहे, असा टोला माजीमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.

हेही वाचा >>> महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे आजपासून कार्यक्रम – गर्भगृह दर्शन बंद

अलीकडेच ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महापालिका निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता. यावर भुजबळांनी बोलायला काय लागते, असे सांगत महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने होणाऱ्या दाव्यांचा कार्यकर्त्यांच्या उत्साहाशी संबंध जोडला. कसबा निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा देण्यात नवीन काही नाही. राज ठाकरे यांची मागील काही महिन्यांपासून तशीच भूमिका राहिली आहे. नाशिकच्या मेट्रो प्रस्तावाचे पंतप्रधान कार्यालयात सादरीकरण झाले. भविष्यात आसपासची गावे नाशिकला जोडली जातील. त्या दृष्टिकोनातून नियमित मेट्रोच्या आखणीचा विचार होणे गरजेचे होते. मेट्रो निओला आपला विरोध नाही. पण हा प्रकल्प लवकर सुरू करण्याची गरज आहे. प्रकल्पात द्वारका ते नाशिकरोड बहुमजली उड्डाणपूल उभारणी प्रस्तावित आहे. उड्डाण पुलांचे खांब रस्त्यावरील वाहतुकीत अडथळे ठरतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यातील सत्ता संघर्षात कायद्याची गुंतागुंत झाली असून वकील आणि न्यायालय कसा मार्ग काढतात, हे पहावे लागणार आहे. धार्मिक स्थळांविषयी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून आता महाराष्ट्रातून देवस्थाने घेऊन जाण्याचे राहिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि कामगारांच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप अशा चर्चा घडविण्याच्या क्ल्पुत्या लढवित असल्याचे सांगितले. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांनी सध्याचे मंत्री अतिशय हुशार, शक्तीशाली असून त्यांची अफाट कार्यक्षमता असून नवीन मंत्री घेतले नाही तरी ते सरकार चालवतील, असा चिमटा काढला. शिवसेनेत कितीही पळापळ झाली तरी जनतेची सहानुभूती उध्दव ठाकरे यांना असून नेते पळाले तरी, मतदार हलणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> धुळे : जीवनावश्यक वस्तूंसह रसायनांचा काळाबाजार ; १५ जणांविरुध्द गुन्हा

आता सदावर्तेंनी मोर्चे काढावेत एसटी कामगारांचे सध्या दोन, तीन महिन्यांचे वेतन थकीत आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे म्हणून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने झाली होती. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. सध्याच्या सरकारमधील अनेकांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे विद्यमान सरकारने त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, मग वेतन रखडण्याचा प्रश्न राहणार नाही. त्यासाठी ॲड. सदावर्तेंनी आताही मोर्चे काढावेत, सत्ताधाऱ्यांच्या घरावर मोर्चे न्यावेत, असा सल्ला भुजबळ यांनी दिला.