महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडताना मागील काही दिवसांपासून भाजपाने लावून ठरलेल्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला. यावेळी राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. राज यांनी शरद पवारांवर केलेली टीका आणि एकूणच भाषणातील मुद्द्यांवरुन राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच आता राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?

राज नेमकं काय म्हणालेले?
शनिवारी गुडीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांच्या राजकारणावर टीका करताना छगन भुजबळांचा उल्लेख केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने शरद पवार यांनी कधी मतदारांचा विचार केला नाही असा ओघाने टीका करत राज ठाकरेंनी भुजबळांचा संदर्भ दिला. “राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिला मंत्री कोण होता जो जाहीर केला गेला. छगन भुजबळ! जे जवळपास दोन अडीच वर्ष जेलमध्ये होते. आहो ते काय स्वातंत्र्य सैनिक नव्हते की सत्ता आल्या आल्या त्यांना तुम्ही मंत्रीपद द्यावं,” असं राज म्हणाले होते. पुढे बोलताना राज यांनी, “पण हे सारं मतदारांच्या नाकावर टीच्चून करतात. एक दिवस अशतो मतदारांचा लाचारासारखं तिकडे रांगेत उभं रहायचं. मतदान करायचं आम्हाला. आम्ही वाटेल ते करु. जो माणूस अडीच वर्ष जेलमध्ये होता त्याला मी पहिला मंत्री करीन. १०० कोटी मागितले म्हणून माझ्या गृहमंत्री जेलमध्ये गेला. काही फरक पडत नाही. काय करणार आहात तुम्ही,” अशा शब्दांमध्ये राज यांनी राष्ट्रवादीच्या धोरणावर टीका केली होती. याच टीकेला आता भुजबळांनी उत्तर दिलंय.

नक्की वाचा >> “शरद पवारांना जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे…”; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

त्यांनी जाहीर करावं की आम्ही…
“राजसाहेबांचं काही कळतच नाही. एवढं एकदम भाजपाविरोधात बोलता बोलता एकच फक्त ईडीने त्यांना फक्त बोलवलं तिकडे. तेव्हापासून इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं. कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला त्यांचा. काय कळतं नाही हे,” असा खोचक टोला भुजबळांनी लगावला. “त्यांना काय सांगायचंय ते स्पष्ट सांगावं. भाजपाची बी टीम म्हणून काम करायचं तर तसंही त्यांनी जाहीर करावं की आम्ही तसे प्रयत्न करतोय. पण असं आडवळणाने बोलत बोलत जाऊन टीका टिप्पणी करण्यात काय अर्थ आहे,” असंही भुजबळ म्हणालेत.

नक्की वाचा >> “पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही…”; नारायण राणेंनी केली राज ठाकरेंची पाठराखण

इंजिनाचं तोंड कुठे कार्यकर्त्यांना कळेना…
“सगळं पाहिल्यावर भाजपाची जाहीर सभा होती की मनसेची होती हे मला कळलं नाही. कारण राज ठाकरेंनी नेहमीच कडवाविरोध भाजपाला केलाय,” असं भुजबळ म्हणाले. “राज ठाकरे बोलतात चांगलं म्हणून बघायला जातात. पण पुढे ते जे वागतात ते लोकांच्या लक्षात येत नाही. कार्यकर्त्यांनाही कळत नाही की आपली दिशा कोणत्या बाजूलाय. आपल्या इंजिनाचं तोंड उत्तरेला, दक्षिणेला आहे, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, काही कळत नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

नक्की वाचा >> “असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही…”; मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचं दिलीप वळसे-पाटलांना थेट आव्हान

आता भाजपा त्यांना…
पत्रकारांनी राज ठाकरे भाजपाच्या जवळ चाललेत असं वाटतं का?, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “काल ते भाजपाचा प्रचार करत होते. फक्त स्टेजवर भाजपाचे झेंडे लावले नव्हते. बाकी ते भाजपाचा प्रचार करत होते,” असं भुजबळ म्हणाले. “त्यांनी तर ट्रॅक बदललाय पण भाजपा त्यांना घेते की नाही ते आपल्याला बघायचं आहे,” असंही भुजबळांनी सांगितलं.

Story img Loader