नाशिक – येवला मतदारसंघात खरवंडी गावातील केंद्रात मतदान यंत्र संथपणे चालत असल्याच्या तक्रारीमुळे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार छगन भुजबळ आणि स्थानिक काही युवकांमध्ये शाब्दिक चकमक झडली. केंद्रात इतका वेळ का थांबले, असा प्रश्न करण्यात आल्याने भुजबळ संतप्त झाले. उमेदवाराला सर्व केद्रावर जाण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी घोषणाबाजी झाली.
हेही वाचा – नाशिक : निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा, नऊ शिक्षकांविरुद्ध गुन्हा
हेही वाचा – नव्याने नाशिक-बोरिवली विद्युत बससेवा प्रारंभ
मतदानाच्या दिवशी भुजबळ यांनी येवला तालुक्यातील मतदान केंद्रांना धावती भेट दिली. दुपारी ते खरवंडी येथील केंद्रात पोहोचले. येथील मतदान यंत्र संथपणे कार्यरत असल्याची अनेकांची तक्रार होती. त्यामुळे त्यांनी केंद्रातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदान यंत्रांबाबत विचारणा केली. योग्य ती तातडीने दुरुस्ती करावी, असे सांगितले. त्यानंतर ते केंद्राबाहेर पडत असताना काही जण भुजबळ यांच्या जवळ आले. मतदान सुरू असताना इतका वेळ आतमध्ये का थांबलात, याबद्दल विचारणा केली. यामुळे भुजबळ संतापले. त्यांनी आपले उमेदवार ओळखपत्र दाखवत उमेदवारांना केंद्रात जाण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले. यावेळी घोषणाबाजी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केला. बाहेर जाण्याविषयी आरडाओरड झाली. खरवंडी गावात ५०० ते ६०० मतदार आहेत. मतदान यंत्रातील संथपणामुळे मतदानास लागणारा विलंब आणि काही युवकांनी विचारलेला जाब यामुळे भुजबळांचा पारा चढला.