नाशिक – मराठा आरक्षणावरून ठिकठिकाणी मराठ्यांकडून ओबीसींना लक्ष्य करुन मारहाण करण्यात येत आहे. दुर्देवाने पोलीस ही परिस्थिती हाताळण्यात मागे पडत आहेत. हे असेच सुरू राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा अन्न पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
शनिवारी येवला येथे भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या गावोगावी मराठा आरक्षणावरून विजयोत्सव सुरू आहे. असे असताना आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसण्याची तयारी का, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. सर्व्हेक्षण, नोंदणी, जे मागितले ते कायद्याच्या कसोटीवर टिकेल का, याविषयी संभ्रम आहे. मराठ्यांकडून ओबीसींवर बहिष्कार टाकला जात आहे. पोलीस या प्रकरणात अपेक्षित असे सक्रिय नाहीत. यामुळे आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडून वेगळाच प्रश्न निर्माण होईल. यामुळे सर्व पक्षांचे प्रमुख, राज्याचे प्रमुख, लोकसेवक, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत विचार करायला हवा, अशी सूचना त्यांनी केली.
हेही वाचा >>>मुसळगाव औद्योगिक वसाहतीत रासायनिक कारखान्याला भीषण आग
पालघर पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याच्या विषयावर, भुजबळ यांनी, फडणवीस यात काय करणार, असा प्रश्न केला. ते दोन लोकांचे भांडण आहे. आपल्यालाही एक आमदार घाणेरडे बोलत आहे. धमकी देत आहे. फडणवीस केवळ अशा प्रकरणात एखाद्याला समज देऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. ओबीसींना हरिभाऊ राठोड यांनी सर्वाधिक मुर्ख बनवले आहे. त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहावे, तायवाडे किंवा अन्य लोकांची केवळ मते आहेत, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.