३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा न झाल्यास एक नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा माजीमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी महामार्गावरील खड्ड्यांची त्यांनी पाहणी केली. संबंधितांची कानउघाडणी करताना जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशाराही भुजबळांनी दिला.
हेही वाचा >>>भुसावळच्या माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक अपात्र ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का
भुजबळ यांनी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गाची पाहणी करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी प्रकल्प अधिकारी साळुंखे, गोंदे ते पडघा टोलवेज पीक इंफ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले आदी उपस्थित होते.मुंबई-आग्रा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणशी पत्रव्यवहार केला. मध्यंतरी यासंदर्भातील बैठकीत प्राधिकरणने सर्व खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, रस्त्यावरील परिस्थिती बदललेली नाही. आजही रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. ३१ ऑक्टोबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास एक नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा >>>सावधान… उपराजधानीत मुलांमध्ये हात, पाय, तोंडात कांजण्यासदृश्य पुरळ !
प्राधिकरणच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
नाशिक-मुंबई महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. खड्डे, वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळेचा अपव्यय होतो. ठाणे-अंजुर फाटा दरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी असते. दोन्ही बाजूला गोदामे असल्याने अवजड वाहनांची सातत्याने ये-जा होते. १० किलोमीटरचे अंतर पार करण्यास बराच वेळ लागतो. महामार्गावरील स्थितीबाबत नाशिक फाउंडेशन अर्थात नाशिक फर्स्टने यापूर्वीच पंतप्रधान कार्यालयाकडे दाद मागितली होती. त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने वेगळेच दावे केले होते. गोंदे ते वडपे विस्तारीकरणाचा विषय आपल्या विभागाशी संबंधित नाही. भिवंडी वळण रस्त्यावरील टोल नाका विस्तारीकरणावेळी हटविला जाऊ शकतो. पावसाळ्यात समांतर रस्ते खराब झाल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा भार वाढतो. आम्ही दुभाजक हटवून वाहतूक सुरळीत राखण्याचा प्रयत्न केल्याचे प्राधिकरणकडून सांगितले गेले होते. खड्ड्यांबाबत आश्वासन देऊनही त्याची पूर्तता करण्यात प्राधिकरणला अपयश आल्याची वाहनधारकांची भावना आहे.