राज्यात करोना रुग्णसंख्या हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे लसीकरणाचा वेग देखील वाढला आहे. मात्र, यामुळे करोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणि प्रशासनाकडून देखील सातत्याने करोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. याच आधारावर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या येवला तालुक्यात बोलताना करोनाचे नियम पाळले नाही, तर तालुक्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे लॉकडाउन टाळायचा असेल, तर नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल, असंच थेट भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.
राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या मंत्रिपदासोबतच नाशिकचे पालकमंत्री देखील असलेले छगन भुजबळ आज जिल्ह्यातल्या येवला तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी येवल्यामध्ये सातत्याने वाढत जाणाऱ्या करोना रुग्णांचं प्रमाण चिंता वाढवणारं असल्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी नागरिकांना पुन्हा लॉकडाउन लाहू करावा लागण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.
“मी दरवेळी सांगतोय नियम पाळा, पण…”
यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी नागरिक करोनासंदर्भातले नियम पाळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “मी दर ८-१० दिवसांनी येवल्याला येतोय. सगळ्यांना सतत सांगतोय की तुम्ही मास्क लावा. तुम्ही नियम पाळा. पण कुणीही नियम पाळत नाहीयेत. कुणी ऐकत नाहीये. त्यामुळे मी स्पष्टच सांगतो तुम्हाला. हळूहळू बाजारपेठा बंद कराव्या लागतील आणि पूर्ण लॉकडाऊन करावा लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.
तसेच, “इथे व्हॅक्सिनचा पुरवठा वाढवायला देखील सांगितलं आहे. लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. कार्यकर्ते लोकांना बोलवून लसीकरण करत आहेत. त्यामुळे थोडा आधार मिळेलच. पण सध्याच्या परिस्थितीत ज्या जोमाने करोना वाढतोय, ते पाहाता जर येवल्याच्या लोकांनी काळजी घेतली नाही, तर दुर्दैवाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागेल”, असं भुजबळ म्हणाले.