नाशिक : बदलापूर प्रकरणाचे विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे. करोना काळात ज्यांनी पैसे खाल्ले, करोना केंद्रात अत्याचार होऊनही जे गप्प राहिले, त्यांनी संस्कृतीच्या गप्पा मारू नयेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना हाणला.
येथील तपोवन मैदानात शुक्रवारी महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत आयोजित महिला मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले. बदलापूरची घटना निंदनीय आहे. या घटनेचे कुठल्याही पध्दतीने समर्थन करता येणार नाही. परंतु, विरोधक त्याचे राजकारण करत आहेत. करोना काळात, ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लुटले, त्यांनी आम्हांला संस्कृती शिकवू नये, असा इशारा शिंदे यांनी दिला. बदलापूर प्रकरणातील संशयितास अटक करण्यात आली आहे. त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आमच्या सरकारची आहे. या घटनेचे राजकारण विरोधकांकडून होत आहे. याला टाळूवरचे लोणी खाणे म्हणतात. लाडकी बहीण नको तर, सुरक्षित बहीण योजना देण्याची विरोधक मागणी करत आहेत. लवकरच आम्ही सुरक्षित बहीण योजनाही आणू, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. त महाराष्ट्र हा बांगलादेश होईल, असे काही जण म्हणतात. हा पुरोगामी महाराष्ट्र असून मतांसाठी असे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्र थारा देणार नाही. महाराष्ट्र बंदचे आवाहन करणाऱ्यांना न्यायालयाने चपराक दिली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा…नाशिक : गर्दी जमविण्यात प्रशासनाला यश
महिला सुरक्षिततेसाठी सुरात सूर मिसळावा – देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही बदलापूरसारख्या घटनांचे राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. आम्ही नराधमांना सोडणार नाही. फाशीपर्यंत पोहचवू. हा प्रश्न कायदा व सुव्यवस्थेचा तसाच सामाजिकही आहे. माझ्याकडे राजीनामा मागणाऱ्यांच्या काळात करोना केंद्रासह अन्य काही ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले होते, तेव्हां तोंड उघडले नाही. कोलकाता प्रकरणात ममता बॅनर्जी यांचे कौतुक करतात. महिला सुरक्षितता महत्वाची वाटत असेल तर आमच्या सुरात सूर मिसळवा, याविषयी जनजागृती करा, ही प्रवृत्ती ठेचून काढा, असे आवाहन फडणवीस यांनी विरोधकांना केले.
© The Indian Express (P) Ltd