सचिव, अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करुन त्वरीत समस्या सोडविण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचा अनुभव शनिवारी नंदुरबारकरांनीही घेतला. नगरपालिकेच्या नुतन इमारतीच्या थकीत सात कोटी, २८ लाख रुपयांच्या देयकाचा प्रश्न व्यासपीठावरुनच भ्रमणध्वनी करुन अवघ्या तीन मिनिटात शिंदे यांनी सोडविल्यावर उपस्थित मंत्र्यांसह सर्वांनी एकच जल्लोष केला.
हेही वाचा >>>नाशिक : जरा धीर धरा, आपले दिवस परत येतील – छगन भुजबळ यांचे शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या नंदुरबार नगरपालिकेच्या कामांचा शेवटचा सात कोटी, २८ लाख रुपयांचा हप्ता थकीत होता. हे देयक तत्काळ मिळावे अशी मागणी नंदुरबारचे शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या भाषणात केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कामाचा दाखला देत नाट्यमंदिराचे प्रलंबित देयक उदघाटनावेळी आलेल्या विलासरावांनी शब्द दिल्याप्रमाणे तीन दिवसात दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही लगेच नाट्यमंदिराच्या व्यासपीठावरुनच मुंबईतील कार्यालयात भ्रमणध्वनी करुन अवघ्या तीन मिनिटात संबंधित देयक देण्याची कार्यवाही करण्यास सांगितले. हा सर्व प्रकार नाट्यमंदिरातील उपस्थित जनसमुदायासमोर घडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कामाचा धडाका पाहुन नंदुरबारकरांनी एकच जल्लोष केला.मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या धडाकेबाज कामाची प्रचिती आगामी काळात जिल्ह्यातील कुपोषणासह आश्रमशाळा, आरोग्यविषयक समस्या सोडवितानाही येईल, अशी अपेक्षा नंदुरबारकरांना आहे.