लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटासह भाजपच्या बंडखोर उमेदवाराचे आव्हान उभे ठाकल्याने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: मैदानात उतरले आहेत. शनिवारी ते नाशिक, अहमदनगरच्या प्रवरानगर-लोणी आणि जळगाव येथे विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.

या मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) महेंद्र भावसार आणि भाजपशी संबंधित विवेक कोल्हे यांच्या बंडखोरीला तोंड द्यावे लागत आहे. ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे रिंगणात आहेत. नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटाला गमवावी लागली होती. ठाकरे गटाने मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिक्षक मतदारसंघात त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिंदे गट सतर्क झाला आहे.

आणखी वाचा-संत निवृत्तीनाथ पालखीचे शहरात आगमन, वाहतूक मार्गात बदल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवारच्या दौऱ्यात पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांशी संस्थाचालकांच्या माध्यमातून संपर्क साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी दोन वाजता एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांची बैठक होईल. यानंतर ते प्रवरानगर, लोणी येथे नगर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतील. सायंकाळी जळगाव येथील हॉटेल आदित्य लॉन्स येथे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.