केळी पिकाचा पोषण आहारात समावेशासह सिंचन प्रकल्पांना निधी, तसेच जिल्ह्यातील धरणगाव, चोपडा, मुक्ताईनगर, एरंडोल, पाचोरा या पाच ठिकाणी एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा- धुळे : जीवनावश्यक वस्तूंसह रसायनांचा काळाबाजार ; १५ जणांविरुध्द गुन्हा
जळगाव तालुक्यातील भोकर येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी अहिराणीतून भाषणाला सुरुवात केली. भोकर- खेडीभोकरदरम्यान तापी नदीवरील पुलामुळे तब्बल ७० किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. अमरावतीच्या धर्तीवर जळगावसह धुळे, नंदुरबारसाठी जळगाव येथे विभागीय कार्यालयाची आवश्यकता असून त्यासाठी लवकरच बैठक घेऊन मंजुरी दिली जाईल. नार-पार-गिरणा प्रकल्पासाठीही लवकरच बैठक घेऊन मान्यता दिली जाईल. जिल्ह्याचा शंभर बस, वारकरी भवन, तसेच ५९२ कोटींची यावल उपसा सिंचन योजना,५४१ कोटींच्या निम्न तापी प्रकल्पाचा मान्यतेचा विषयही लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
भूमिपूजन, लोकार्पण झालेली कामे
भोकर- खेडीभोकरी तापी नदीवरील पुलाच्या भूमिपूजनासह काही कामांचे लोकार्पण, ई-भूमिपूजन झाले. त्यात २५ कोटींच्या शिवाजीनगर भागातील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण, मोहाडी (जळगाव) येथे ७५ कोटी ३१ लाखांच्या शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाचे भूमिपूजन, ३५ कोटींच्या म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन, ४२ कोटींच्या जळगाव महापालिका हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्तेकामांचे भूमिपूजन, ४० कोटींच्या बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन आदी कामांचा समावेश आहे