देवळा तालुक्यातील विठेवाडीच्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसाकाची चक्रे पुन्हा एकदा सहकारी तत्त्वावर फिरणार आहेत.
या बाबतची माहिती आ. डॉ. राहुल आहेर यांनी दिली. या कार्यक्रमास सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, संचालक मंडळ सदस्य उपस्थित राहणार आहेत.
कसमादे परिसराचे वैभव असलेला ‘वसाका’ तीन वर्षांपासून कर्जबाजारीपणामुळे बंद पडला होता. मात्र हा कारखाना पुन्हा सुरू होण्यासाठी माजीमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे सतत प्रयत्न सुरू होते. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने ते काम काही काळ रेंगाळले.
त्यांचे पुत्र आ. डॉ. राहुल आहेर आणि जिल्हा परिषद कृषी सभापती तथा जिल्हा बँक संचालक केदा आहेर यांनी शासनदरबारी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यात राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळ तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार्य मिळाले.
जिल्हा बँकेने शासनाची हमी मिळाल्यानंतर कर्जपुरवठा मंजूर केला तर राज्य सहकारी बँकेने आपली जप्ती कारवाई मागे घेत कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
बंद पडलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना पुन्हा सहकारी तत्त्वावरच सुरू होत असल्याने कारखाना कर्मचारी वर्गासह शेतकरी आणि परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी याचे स्वागत केले आहे.

Story img Loader