नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक त्या कामांचे सुक्ष्म नियोजन करून अंतिम आराखडा तयार करावा, प्रयागराजला भेट देऊन स्थानिक अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा अभ्यास करावा, शहरातील गोदावरीचा काठ हरित करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, अशा विविध सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.
मुंबईत मुख्य सचिव सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा तयारी आणि नाशिकशी संबंधित विविध विषयांवर बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यास आता केवळ दोन वर्षाचा कालावधी बाकी आहे. सरकारने कुंभमेळा नियोजनासाठी जिल्हा ते राज्य स्तरापर्यंत समित्या स्थापन केल्या आहेत. नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर पालिकेसह अन्य विभागांनी कुंभमेळ्याच्या दृष्टीने आराखडे तयार केले आहेत. सिंहस्थासाठी आवश्यक कामांचे सुक्ष्म नियोजन करून कुंभमेळा आराखडा अंतिम करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.
हेही वाचा…नववर्षाचे नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांकडून सामूहिक सूर्यनमस्काराव्दारे स्वागत
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे तीन जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कुंभमेळा होत आहे. काही विभागातील अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन अभ्यास करावा, असे सौनिक यांनी सूचित केले. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी तपोवन परिसरात ३१८ एकर जागा निश्चित केलेली आहे. सिंहस्थ कालावधी वगळता उर्वरित ११ वर्षात या जागेचा कुठलाही वापर होत नाही. या जागेचा उपरोक्त काळात कसा वापर करता येईल याचा विचार करण्यास सौनिक यांनी सांगितले. गोदावरीचा नदीकाठ परिसर हिरवागार कसा करता येईल, यावर लक्ष देण्यास सांगण्यात आले. महापालिकेने नमामि गोदा प्रकल्पाचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. राज्य सरकारकडून त्याचा पाठपुरावा करण्याचे मान्य करण्यात आले. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासंबंधीच्या नियोजनावर चर्चा झाली. शहरात मेट्रोनिओसह इलेक्ट्रिक मेट्रोवर चर्चा होत आहे. शहराच्या दृष्टीने कोणता प्रकल्प योग्य ठरू शकतो, याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले.