लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : मलनिस्सारणासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठेकेदाराच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या शोषखड्ड्यात पडल्याने चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. हरसूल परिसरातील देवरगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी ठेकेदाराविरुध्द हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे यांचे निधन
देवरगांव ग्रामपंचायत परिसरात सुनील कापसे याने गटारीच्या कामांचा ठेका घेतला आहे. कापसेने परिसरात गटारीच्या पाण्यासाठी काही शोषखड्डे खणले. परंतु, त्यासंदर्भात कुठलीही खबरदारी घेतली नाही. संरक्षक जाळी अथवा उपाययोजना केल्या नाहीत. गावातील किरण मोरे यांच्या घराशेजारीही शोषखड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्याजवळ खेळत असतांना मोरे यांचा चार वर्षांचा मुलगा माही उर्फ कार्तिक हा खड्ड्यात पडून गटारीच्या पाण्यात बुडाला. बालकाच्या मृत्यू प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात कापसेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.