लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : नाशिकरोड येथील विहितगाव-वडनेर रोडवरील हंडोरे मळा येथे गुरूवारी संध्याकाळी दारात खेळत असलेल्या बालकावर बिबट्याने झडप घातली. आरडाओरड केल्यानंतर बालकाला सोडून बिबट्या पळून गेला. बालकाच्या मानेवर आणि डोक्यावर जखमा झाल्या असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विहितगाव-वडनेर रोडवरील हंडोरे मळा वालदेवी नदीकिनारी आहे. या वस्तीतील चार वर्षीय ऋषिकेश प्रकाश चांद्रे हा आई स्वयंपाक करत असल्याने ओट्यावर खेळत होता. त्यावेळी जंगलातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने ऋषिकेशवर हल्ला केल्याचे आईच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड केली, तोपर्यंत बिबट्याने ऋषिकेशला काही अंतरापर्यंत फरपटत नेले होते. आरडाओरड ऐकून बिबट्याने ऋषिकेशला सोडून वालदेवी नदीकिनारी असलेल्या जंगलात पळ काढला. जखमी ऋषिकेशला प्रथम बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानेवर, डोक्यावर बिबट्याचे नख आणि दात लागल्याने रक्तबंबाळ झालेल्या ऋषिकेशला त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात मुलीसह आईची आत्महत्या

माजी नगरसेवक जगदीश पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम कोठुळे यांनी वनविभागाशी संपर्क साधून जखमी ऋषिकेशच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी आणि परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी केली. वनाधिकारी अनिल अहिरराव, विजयसिंग पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child injured in leopard attack in nashik mrj