धुळे – जिल्ह्यातील नागरीकांच्या सहकार्याने गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बाल विवाह निर्मुलन जनजागृती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद म्हणून अनेक नागरीक स्वत:हून पुढे येऊन बाल विवाहाबाबत प्रशासनास माहिती देत आहेत. १३ मार्च रोजी वेहेरगाव फाटा (ता. साक्री) या ठिकाणी बाल विवाह होणार असल्याची माहिती चाइल्ड लाईन १०९८ या मदतवाहिनीवर प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश नेरकर, परिवीक्षा अधिकारी, सतीश चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी समन्वय साधून जिल्हा बाल संरक्षण कक्षातील देवेंद्र मोहन, संरक्षण अधिकारी (संस्थाबाहय) ज्ञानेश्वर पाटील, चाईल्ड लाईन प्रतिनिधी यांचे पथक तयार करून संबंधित गावाचे पोलीस पाटील, ग्रामसेवक अमोल भामरे, सरपंच यांच्याशी संपर्क साधला. निजामपूरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी वेहेरगाव येथील प्रकरणात तात्काळ दखल घेऊन हवालदार रतन मोरे यांच्यासोबत या कार्यालयाच्या पथखाने वेहेरगाव येथे भेट देऊन कार्यवाही करण्यात आली. या गावात दोन अल्पवयीन बहिणींचा एकाच मांडवात होणारा बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश मिळाले.
हेही वाचा – नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर संपकऱ्यांचा मोर्चा; मोर्चेकऱ्यांची आठ किलोमीटर पायपीट
दुसऱ्या प्रकरणात नागसेन नगर (देवपूर, धुळे) येथे बालविवाह होत असल्याची तक्रार देवपूर पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती. त्यानुसार निरीक्षक एम. डी. निकम यांनी या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील तृप्ती पाटील, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) पोलीस ठाण्यातील थाटसिंगार, सुनील गवळे, रोहिदास अहिरे, एस. एस. पाटील, दिलीप वाघ, बी. वाय. नागमल, ए.व्ही. जगताप यांच्या सहकार्याने बालविवाह रोखण्याची कार्यवाही करण्यात आली. वर-वधू यांना हळद लागली होती, दोघांना हळदीच्या कपड्यांसह बाल कल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले.
धुळे – नाशिक जिल्ह्यात एक हजार ५६ संपकरी महसूल कर्मचाऱ्यांना नोटीस
तिसऱ्या प्रकरणात मालपूर (शिंदखेडा) येथे १७ मार्च रोजी बाल विवाह होणार असल्याची माहिती मिळाली, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे देवेद्र मोहन, संरक्षण अधिकारी (संख्याबाहय) व चाईल्ड लाईनचे ज्ञानेश्वर पाटील यांनी १४ मार्च रोजी पोलीस विभाग, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या मदतीने सदरचा बालविवाह रोखण्यात आला. संबंधित बालविवाह होणाऱ्या ठिकाणी बालक व बालिका यांचा जन्मपुरावा तपासणी करून बालिका १८ वर्षांखाली असल्याची खात्री पटविल्यानंतर लगेच लग्न घरी वर पक्ष आणि वधू पक्ष यांना एकत्र बसवून बाल विवाहबाबतचे दुष्परिणाम व बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित सर्वांना माहिती देण्यात आली. संबंधितांना बाल कल्याण समितीसमोर उपस्थित करून मुलीच्या वडिलांकडून मुलीचे १८ वर्ष वय पूर्ण होईपर्यंत बालिकेचा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले.