नाशिक : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र दणक्यात साजरा होत असताना आजही आदिवासीबहुल परिसरातील जनतेचा मूलभूत सोयी सुविधांसाठी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष कधी हंडाभर पाण्यासाठी तर, कधी दोन वेळच्या जेवणासाठी असतो. या संघर्षांतून पोटची मुले वेठबिगारीसाठी विकण्याची वेळ या अभावग्रस्तांवर आली आहे, तिही दोन-चार हजार रुपये आणि एखाद्या मेंढीच्या मोबदल्यात.
नगर, नाशिक जिल्ह्यातील २० ते २५ मुलांची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ही सर्व मुले ६ ते १५ या वयोगटातील आहेत. दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रत्येकी साधारण दोन ते पाच हजार रुपये, एखादी मेंढी, दारू देऊन मुलांची खरेदी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. दलालाने मेंढपाळांकडे मेंढय़ा वळवण्याच्या कामासाठी यातील बहुतेक मुले विकली आहेत.
हेही वाचा >>>बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी फरार? नातेवाईकांना विचारलं तर म्हणतात “आम्हाला…”
उभाडे येथील गौरी आगिवले या १० वर्षांच्या मुलीच्या मृत्युमुळे हे धक्कादायक वास्तव उघड झाले. गौरीच्या पालकांनी याविरोधात आवाज उठवला. श्रमजीवी संघटनेच्या सहकार्याने इगतपुरी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांच्या मदतीने आतापर्यंत आठ बालकांची वेठबिगारीतून सुटका करण्यात आली. मुलांचा छळ करणाऱ्यांविरुध्द घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना अटक करुन अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शिक्षणाचा अभाव, रोजगार नाही, रोजची गुजराण करण्याची अडचण अशा अगतिकतेतून आई-वडीलच मुलांची विक्री करतात. काहीवेळी त्यांना एखाद्या कामापुरते मुलांना पाठवण्याबाबत सांगितले जाते. मात्र त्यानंतर वर्षांनुवर्षे ही मुले वेठबिगारीत अडकतात.
काय झाले?
इगतपुरी तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील १८ हून अधिक बालकांची वेठबिगार म्हणून विक्री करण्यात आली असून त्यातील आठ जणांची सुटका करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील सहा मुलांना अशा प्रकारे मेंढय़ा चारण्यासाठी मेंढपाळांकडे सोपविण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
गुलामगिरीच्या कथा..
वेठबिगारी करणाऱ्या बालकांची सुखरूप सुटका केल्यानंतर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले. त्यांचे म्हणणे नोंदविण्यात आले. मालक दररोज पहाटे पाचला उठवून मेंढय़ांचे दूध काढायला लावायचे. आईवडिलांची भेट होत नव्हती. काही मालकांनी वडिलांना पैसे देवून आम्हांला कामाच्या ठिकाणी आणल्याचे सांगितले. काम चुकले तर पायावर आणि पाठीवर जबर मारहाण करण्यात येत असे. सातत्याने शिवीगाळ करत मारहाण सुरू रहायची. रात्री केव्हाही विहीरीतून पाणी काढायला लावायचे, घरातील कामे सांगायचे. पोटभर जेवायला दिले जात नव्हते. शेठ बुक्क्यांनी मारहाण करायचे, असे अनुभव मुलांनी सांगितले.
अगतिकतेमुळे.. इगतपुरी तालुक्यात कातकरी आदिवासी समाज मोठय़ा प्रमाणावर आहे. आदिवासी पाडय़ांवरील लोकांकडे अद्याप शिधापत्रिका, आधारकार्ड, अशी शासकीय ओळखही नाही. वीज, पाणी, रस्ते अशा सुविधा पोहचलेल्या नाहीत. बहुतांश ग्रामस्थ अशिक्षित आहेत. याचा फायदा दलाल घेत आहेत.