नाशिक – बुधवारी दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून भुसावळ विभाग रेल्वे पोलीस, सुरक्षा दल आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त कारवाईत भुसावळ आणि मनमाड स्थानकात ताब्यात घेण्यात आलेल्या ५९ बालकांना बोलते कसे करायचे, हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. या मुलांची तस्करी रोखण्यात यश आले असले तरी या मुलांचे गाव, त्यांचे शिक्षण, त्यांना पुणे, सोलापूरला का नेण्यात येत होते, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
कोणत्याही मुलाला उलटसुलट प्रश्न विचारले तरी त्यांची साचेबद्ध उत्तरे येत असल्याने बालकल्याण समितीसह समुपदेशन करणारेही चक्रावले आहेत. बालकांची तस्करी की मदरश्याच्या आड काही वेगळी योजना यामागे होती, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधील या बालक तस्करी प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बालकांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. बालकल्याण समिती, चाईल्डलाईनसह अन्य काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बालकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बुधवारी सायंकाळी उशिरा या बालकांना बाल न्यायालयात हजर केल्यानंतर उंटवाडी येथील निरीक्षण गृह तसेच द्वारका येथील निवारा गृहात ठेवण्यात आले आहे. बहुतांश बालकांना हिंदीही समजत नाही. तुझे नाव, कुठून आले, आधी घरी काय करत होतात, असे काही प्रश्न विचारले तरी बालकांचे चेहरे कावरे बावरे होतात. एकमेकांकडे पाहत नेमकं काय उत्तर द्यायचे, हा प्रश्न त्यांना पडतो. थोडा वेळ गेला की, माझे नाव…मी इथून आलो…हापिसने शिक्षणासाठी आणले, अशीच उत्तरे प्रश्नांचा आणि मुलांचा वयोमानानुसार क्रम बदलला तरी येत आहेत. या बालकांना कोणीतरी पढवून पाठविले की, मुले खरंच कोणाच्या दबावाखाली आहेत, याचा अंदाज बालकल्याण समिती आणि सामाजिक संस्था घेत आहे.
यातील बहुतांश बालकांनी शाळाही अद्याप पाहिलेली नसल्याचे समुपदेशनात उघड झाले आहे. गावातील एखाद्या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. मात्र अभ्यासात गोडी नसल्याने ते पळून जायचे. काहींनी करोना काळात शाळा सोडून दिली. अशा मुलांना मदरशात शिक्षण दिले जाईल, असे सांगत गावातून आणले गेले. मात्र आपण कुठून, कुठे जाणार हे कोणालाच सांगता येत नाही. किश्कंद गावातील आहोत, उर्दू, अरेबी शिकायची, नमाजमधील कलमे शिकायची आहेत, एवढेच ते सांगतात.
रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत बालकांना ताब्यात घेताना ती सांगली येथे जाणार होती, अशी माहिती मिळाली. शिक्षण स्थानिक किंवा राज्यातही उपलब्ध होऊ शकत असताना सांगली किंवा पुणे का? ज्या ठिकाणी ही बालके मदरशात शिक्षणासाठी जाणार होती त्या धार्मिक संस्थेशी संशयितांचा कुठला पत्रव्यवहार झाला का? यामागे बाल तस्करी की अन्य काही, अशा प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी असल्याने बाल कल्याण समितीसमोर बालकांना बोलतं करण्याशिवाय पर्याय नाही.