जळगाव – भुसावळ येथील रेल्वे व लोहमार्ग पोलिसांनी ३० मे रोजी कथित बालतस्करी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आणि शहरातील बालसुधारगृहात ठेवलेली २९मुले मंगळवारी १४ दिवसांनंतर बिहारमधील पूर्णिया व अररिया येथे रवाना झाली. भुसावळहून भागलपूर एक्स्प्रेसच्या राखीव डब्यातून त्यांना रवाना केले.
भुसावळ रेल्वे व लोहमार्ग पोलिसांनी २९ मुलांना बालकल्याण समितीकडे स्वाधीन केले होते. त्या बालकांच्या सुटकेसाठी जळगाव जिल्हा मणियार बिरादरी व विविध संघटनांनी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर मंगळवारी त्या २९बालकाची सुटका करून बालकल्याण समितीने खासगी गणवेशधारी पोलिसांसह त्यांची रवानगी बिहारमधील पूर्णिया व अररिया येथील जिल्हा बालकल्याण समितीकडे केली आहे.
जळगाव ते भुसावळ या बालकांचा व पोलिसांचा प्रवास दोन खासगी प्रवासी वाहनांतून मणियार बिरादरीच्या माध्यमातून आणि ट्रेंड इंजिनिअरिंगचे साजीद शेख यांच्या सहकार्याने करण्यात आला. शासनातर्फे भुसावळ ते भागलपूर रेल्वेत राखीव डबा उपलब्ध करून देण्यात आला.
हेही वाचा >>>आश्रमशाळा रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ; बाह्यस्त्रोताद्वारे मनुष्यबळ नेमण्यास विरोध
मंगळवारी दुपारी तीनला भुसावळहून एक्स्प्रेस रवाना झाली. बालकांना निरोप देण्यासाठी मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष मझहर पठाण, शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, ईदगाह ट्रस्टचे सचिव अनिस शाह, हुसैनी सेनेचे अध्यक्ष फिरोज शेख, भुसावळचे इम्तियाज शेख, नदिम बागवान, साजीद शेख, तिकीट तपासणीस अकील शेख, नवीद शेख यांच्यासह जीआरपीचे पोलीस निरीक्षक विजय बाबा, सहाय्यक पोलीस निरीक्षक मगरे व कर्मचार्यांची उपस्थिती होती.