भरगच्च कार्यक्रम, गिफ्टसची रेलचेल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

#नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नाताळला अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली असून यानिमित्त पुढील सलग दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच, येशू खिस्त जन्माच्या आकर्षक देखाव्यांनी चर्च परिसर उजळून निघाले. यानिमित्त बाजारात ख्रिसमस ट्री अन् वेगवेगळ्या गिफ्ट्सची रेलचेल झाली आहे.

दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली की, प्रत्येकाला नाताळ आणि त्याच्या जोडीला येणाऱ्या ‘थर्टी फस्ट’चे वेध लागतात. नाताळच्या पाश्र्वभूमीवर, शरणपूर रस्त्यावरील सेंट आंद्रिया चर्च, त्र्यंबक नाका चौकातील होलिक्रॉस चर्च, नाशिकरोड येथील सेंट झेवियर्स चर्च, जेलरोडवरील सेंट अ‍ॅना, देवळाली कॅम्पस्थित सेंट पॅट्रीक चर्च आदी ठिकाणी ख्रिस्त जन्माचे आकर्षक देखावे साकारण्यात आले. बहुतेक चर्च नेत्रदीपक रोषणाईने झगमगले आहेत. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी चमकणाऱ्या पताकांमुळे त्यात वेगळेच रंग भरले गेले. अशा उत्साहपूर्ण वातावरणात नाताळाच्या पूर्वसंध्येला बाप्तिस्मा विधीने नाताळच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. रात्री ११ वाजता ‘मिडनाइट सव्‍‌र्हिस’ उपदेश व पवित्र सहभागितेचा विधी झाला. रात्री १२ वाजता फटाक्यांची आतशबाजी करत ख्रिस्तजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता बहुतेक ठिकाणी सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. ख्रिश्चन बांधवांना नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी आप्तमित्रांबरोबर राजकीय पदाधिकाऱ्यांनी चर्च परिसरात गर्दी केली.

नाशिक-पुणे रस्त्यावरील चर्चमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष दिले. नाताळनिमित्त सकाळी सहा वाजेपासूनच विविध चर्चमध्ये कार्यक्रमांना सुरुवात झाली. पवित्र सहभागिता, संगीत, महाविधी, उपदेश व पवित्र सहभागिता, केक वाटप आदी कार्यक्रम झाले. होली क्रॉस चर्चमध्ये भारतीय एकात्मता समितीतर्फे ख्रिस्त जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त सर्वधर्मीय सद्भावना व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

दहा दिवस उत्साहात हा सण साजरा करण्याचे नियोजन चर्चने केले आहे. त्यासाठी आनंद मेळा, विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा व अन्य स्पर्धा, चर्चच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा या स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घरातही देखावे साकारताना कुटुंबीयांनी अधिकाधिक कल्पकता आणण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता ख्रिसमस ट्री, बेल्स, सजावट साहित्य, म्युझिकल लायटिंग, पुतळा आदींचा वापर करण्यात आला. नाताळामुळे उत्तर महाराष्ट्रातील वातावरण वेगळ्याच उत्साहाने भारले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Christmas celebrating not only in nashik but in north maharashtra also