सर्वत्र आकर्षक रोषणाई

दिवाळीत ज्याप्रमाणे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण अनुभवयास मिळते, तितक्याच अभूतपूर्व उत्साहात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नाताळ साजरा केला जातो. यानिमित्त शुक्रवारपासून सलग दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणचे चर्च आकर्षक रोषणाई आणि येशू खिस्त जन्माच्या आकर्षक देखाव्यांनी सजले आहेत. बाजारात ख्रिसमस ट्री अन् वेगवेगळ्या गिफ्टस्ची रेलचेल असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘सांताक्लॉज’ला आणण्याचा मार्ग व्यावसायिकांनी स्वीकारला आहे.
दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली की, प्रत्येकाला नाताळ आणि त्याच्या जोडीला येणाऱ्या ‘थर्टी फस्र्ट’चे वेध लागतात. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी सारे घटक एकत्र येऊन तो साजरा करतात. नाशिकरोड व शरणपूर रोड भागातील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य मोठी गर्दी करतात. या प्रक्रियेत सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची चढाओढ असते. नाताळच्या पाश्र्वभूमीवर, सध्या शरणपूर रस्त्यावरील संत आंद्रिया चर्च, त्र्यंबक नाका चौकातील होलिक्रॉस चर्च, नाशिकरोड येथील सेंट झेवियर्स चर्च, जेलरोडवरील संत अ‍ॅना, देवळाली कॅम्पस्थित सेंट पॅट्रिक चर्च आदी ठिकाणी ख्रिस्त जन्माचे आकर्षक देखावे साकारण्यात येत आहे. बहुतेक चर्च नेत्रदीपक रोषणाईने झगमगीत झाले असून ख्रिसमस ट्री, रंगबेरंगी चमकणाऱ्या पताकांचा सजावटीत वापर केला जात आहे.
बहुतेक चर्चमध्ये नाताळचे दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री ख्रिस्तजन्माचा सोहळा झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता बहुतेक ठिकाणी महाभक्ती अर्थात सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत काही चर्चमध्ये धार्मिक गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच आनंद मेळा, विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा, चर्चच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमांद्वारे नाताळ सण साजरा केला जाणार असल्याची माहिती चर्चच्या सभासदांनी दिली. याच पद्धतीने उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक चर्चेमध्ये धार्मिक कार्यक्रम, सामूहिक प्रार्थना यासोबत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घरातही देखावे साकारताना कुटुंबीयांनी अधिकाधिक कल्पकता आणण्याचा प्रयत्न केला. नाताळनिमित्त सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तूंनी दुकाने सजली आहेत. हा सण केवळ ख्रिश्चनधर्मीय नव्हे, तर सर्व घटक मोठय़ा उत्साहाने साजरा करत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
नाताळनिमित्त ५० ते तीन हजार रुपयांपर्यंत ख्रिसमस ट्री, २० ते एक हजार रुपयांपर्यंतच्या किमतीच्या बेल्स, ट्री सजावट साहित्य, म्युझिकल लायटिंग, पुतळा आदी वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील बडय़ा व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सांताक्लॉजला आणण्याचा मार्ग स्वीकारला.

नाताळनिमित्त ‘बीएसएनएल’तर्फे सवलत
नाताळ आणि नवीन वर्षांनिमित्त भारत संचार निगमने प्री-पेड भ्रमणध्वनीधारकांसाठी ‘टॉपअप’वर २० टक्क्यांपर्यंतचा अधिक ‘टॉक टाइम’ देऊ केला आहे. त्यानुसार २९० च्या टॉपअपवर ३२० रुपयांचा टॉक टाइम, ३९० (४३३), ८९० (१०००), २००० रुपयांच्या टॉपअपवर २३०० च्या टॉक टाइम मिळणार आहे. या सवलतींचा लाभ २ जानेवारी २०१६ पर्यंत घेता येईल, असे नाशिकचे महाप्रबंधक सुरेश प्रजापती यांनी म्हटले आहे.

Story img Loader