नाशिक : शहर परिसरात नाताळला अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली असून यानिमित्त पुढील सलग १० दिवस धार्मिक, सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणचे चर्च आकर्षक रोषणाई आणि येशू खिस्त जन्माच्या आकर्षक देखाव्यांनी सजले आहेत. यानिमित्त बाजारात ‘ख्रिसमस ट्री’ अन् वेगवेगळ्या भेट वस्तूंची रेलचेल झाली आहे.

दिवाळीनंतर प्रत्येकाला नाताळ आणि त्याच्या जोडीला येणाऱ्या नववर्षांचे वेध लागतात. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी सारेजण  एकत्र येऊन तो साजरा करतात. नाशिकरोड, शरणपूर रोड भागात ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वानी गर्दी केली.  सध्या शरणपूर रस्त्यावरील सेंट आिंद्रया चर्च, त्र्यंबक नाका चौकातील होलीक्रॉस चर्च, नाशिकरोड येथील सेंट झेवियर्स चर्च, जेलरोडवरील सेंट अ‍ॅना, देवळाली कॅम्पस्थित सेंट पॅट्रीक चर्च आदी ठिकाणी ख्रिस्त जन्माचे आकर्षक देखावे साकारण्यात आले. बहुतेक चर्च नेत्रदीपक रोषणाईने झगमगले आहेत. ख्रिसमस ट्री, रंगबेरंगी चमकणाऱ्या पताकांमुळे रोषणाईत वेगळेच रंग भरले गेले. ठिकठिकाणच्या चर्चेमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. रात्री ख्रिस्तजन्माचा सोहळा झाल्यानंतर सकाळी बहुतेक ठिकाणी महाभक्ती अर्थात सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. या काळात अनेक चर्चमध्ये पारंपरिक गीतांचा कार्यक्रम, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबक रस्त्यावरील होली क्रॉस चर्चच्यावतीने आदिवासी भागातील पाच महिलांना आर्थिक मदत देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यात पतीच्या आत्महत्येनंतर अनेक अडचणींवर मात करून कुटुंबाची धुरा सांभाळणाऱ्या महिलांचा समावेश आहे.

नाताळनिमित्त सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तूंनी दुकाने सजली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, हा सण केवळ ख्रिश्चनधर्मीय नव्हे, तर सर्व घटक मोठय़ा उत्साहाने तो साजरा करत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यानिमित्त ५० ते तीन हजार रुपयांपर्यंत ख्रिसमस ट्री, २० ते एक हजार रुपयांपर्यंतच्या किमतीच्या बेल्स, ट्री सजावट साहित्य, संगीतमय विद्युत माळा, पुतळा आदी वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बडय़ा व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सांताक्लॉजला आणण्याचा मार्ग स्वीकारला. नाताळामुळे वातावरण वेगळ्याच उत्साहाने भारले आहे.

Story img Loader