जळगाव – अमळनेर येथे झालेल्या दंगलीत अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. मृत तरुणाच्या कुटुंबियांसह विविध सामाजिक संघटनांच्या मागणीनंतर पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अमळनेर येथील दंगल प्रकरणी १० ते १४ जून या कालावधीत पोलीस कोठडीत असलेला संशयित अशफाक शेख सलीम याला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यावर तीन तासांतच प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि पोलीस कर्मचार्यांना निलंबित करून सीआयडी चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेत केली होती. तसेच वरिष्ठांकडेही पत्राद्वारे मागणी केली होती. त्याअनुषंगाने पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी आदेश दिले आहेत.
हेही वाचा – नाशिक: दुचाकी घसरल्याने बालिकेचा मृत्यू
नाशिक सीआयडीने जळगाव पोलीस अधीक्षकांकडील पंचनामा, शवविच्छेदन अहवाल व इतर सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात करावी, असे आदेश दिले आहेत. याबाबतचे लेखी पत्र पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले आहे.