वेतन मिळण्यास दिरंगाई होत असल्याची तक्रार करीत गुरूवारी सकाळपासून वाहक अकस्मात संपावर गेल्यामुळे महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा ठप्प झाली. अनेक शाळा व महाविद्यालयांत परीक्षा सुरू आहेत. अकस्मात बस सेवा बंद झाल्याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला. परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागली.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनेक मुद्यांवरून मतभेद आहे. सिटीलिंक प्रशासनाच्या काही अटी-शर्ती कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत. या संदर्भात वाहकांनी कामगार उपायुक्तांकडे दाद मागून संपाची नोटीस दिलेली आहे. तथापि, वाहकांनी त्या तारखेपर्यंत काही तोडगा निघेल, याची प्रतीक्षा न करताच अकस्मात संप सुरू केल्याचे सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थी व शहरवासीय वेठीस धरले गेले. वाहकांच्या कार्यपध्दतीबाबत पोलिसात तक्रार देण्याची तयारी सिटीलिंकने केली आहे.
हेही वाचा >>>नाशिक : वर्गात किमान ५० विद्यार्थी – पटसंख्या वाढविण्यासाठी मनपाची प्रवेश मोहीम
सिटी लिंकच्या सुमारे २५० बसेस शहर व ग्रामीण भागात धावतात. गुरूवारी अनेक शाळांमध्ये वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर होता. पासधारक हजारो विद्यार्थी सिटीलिंकने प्रवास करतात. सकाळी विविध थांब्यांवर विद्यार्थी बराच वेळ बसची प्रतीक्षा करीत होते. संपाची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पर्यायी व्यवस्थेने शाळा व महाविद्यालयात पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. काहींना पेपरला वेळेत पोहोचता आले नसल्याचे सांगितले जाते. तपोवन आगारात सिटीलिंकच्या शेकडो बसेस उभ्या होत्या. वाहक निघून गेल्याने चालकांना आगारात बसून रहावे लागले. दरम्यान, सिटीलिंक व्यवस्थापन संपकरी वाहकांशी चर्चा करीत आहे. लवकरच बस सेवा पूर्ववत केली जाईल असे सिटीलिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले.