धुळे : शहरातील पांझरा नदीकिनारी सिध्देश्वर गणपती मंदिर ते कालिका माता मंदिर दरम्यान जाॅगिंग ट्रॅकवर चाकूचा धाक दाखवून पुजार्यास लुटल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहरातील चितोड रोडवरील भाईजी नगरात राहणारे पुजारी दिनेश शर्मा (३९) हे २८ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील पांझरा नदीकिनारी सिध्देश्वर गणपती मंदिर ते कालिका माता मंदिर दरम्यान जॉगिंग ट्रॅकवरुन जात असताना पंचमुखी मंदिराच्या पाठीमागून २२ ते २५ वर्ष वयोगटातील तीन अनोळखी तरुण आले. त्यांनी शर्मा यांना बेसबॉलच्या दांड्याने पाठीवर मारुन जमिनीवर खाली पाडले. त्यांच्या गळ्याला चाकू लावून मारहाण करीत जखमी केले. त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची साखळी, खिशातील चार हजार रुपये रोख हिसकावून मोटारसायकलने पळून गेले.
याप्रकरणी दिनेश शर्मा यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक दीपक पाटील यांनी शोध पथकाला संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. पथकाने तपास चक्रे फिरवुन संशयित सुनील गायकवाड (३९, रा. जवाहर कुस्ती स्टेडियमच्या पाठीमागे देवपूर), बाळासाहेब देवरे (३४, रा. आंबेडकर चौक, मनोहर चित्रमंदिरामागे, धुळे) या दोघांना शहरातील गणपती मंदिर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना चोरी करताना वापरलेल्या मोटारसायकलसह शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडून ९० हजार रुपयांची सोन्याची साखळी, चार हजार रुपये रोख, ५० हजाराची मोटारसायकल, चाकू, बेसबॉलचा दांडा असा एकूण एक लाख ४४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक एस.एस. जाधव, कैलास माळी, शोध पथकातील अंमलदार रविकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, अमित रनमळे, तुषार पारधी, अमोल पगारे, प्रशांत नाथजोगी, अमोल कापसे, योगेश ठाकूर, धम्मपाल वाघ, हनीफखाँ पठाण, केतन पाटील यांनी केली आहे.