नाशिक : महानगरपालिकेच्या सिटीलिंक बसच्या चालक व वाहकांनी एका नादुरुस्त रिक्षाला टेकू देऊन पुढे नेल्याची चित्रफित समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर गंभीर दखल घेत सिटीलिंक प्रशासनाने संबंधित चालक व वाहकाला सिटीलिंकच्या सेवेतून कमी केले.
सोमवारी ही चित्रफित समाजमाध्यमात प्रसारित झाली होती. सिटीलिंक चालक-वाहकाने नादुरुस्त रिक्षाला टेकू देऊन (टोइंग ) धोकादायकपणे पुढे नेल्याची ही चित्रफित होती. या प्रकरणातील गांभिर्य लक्षात घेऊन प्रशासनाने चौकशी केली. पिंपळगाव बसवंत ते नवीन सीबीएस या मार्गावर धावणारी ही बस होती. एचएएल प्रवेशद्वाराजवळ बंद पडलेल्या रिक्षाला या बसचे चालक व वाहकाने सिटीलिंक कार्यालयाशी कोणताही संपर्क न साधता तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता टेकू देऊन पुढे नेले. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने प्रशासनाने संबंधित चालक व वाहकांंना सिटीलिंक सेवेतून कमी करण्याचे व पुन्हा सेवेत न घेण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला दिले.
हेही वाचा…कालवा सल्लागार समिती बैठकांची सूत्रे जलसंपदा मंत्र्यांकडे, पालकमंत्र्यांअभावी पुढाकार
प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासन कधीही पाठीशी घालणार नाही. अशा घटना आढळल्यास माहितीसह त्यासंबंधातील छायाचित्र वा चित्रफिती ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या मदतवाहिनीवर पाठवून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.