लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: ठेकेदाराने थकीत वेतन दोन दिवसात देणे तसेच उशीराच्या फेऱ्यांबाबत वाहकांना झालेल्या दंडाच्या फेर पडताळणीला महानगर परिवहन महामंडळाने संमती दिल्यामुळे ४० तासानंतर महानगरपालिकेची सिटीलिंक सेवा अल्प प्रमाणात सुरु झाली. वाहकांच्या आंदोलनामुळे सलग दुसऱ्या दिवशी हजारो विद्यार्थी व नोकरदारांना फटका बसला. वाहकांच्या आंदोलनावर तोडगा निघाला असला तरी महापालिकेसमोर आता नवीन संकट उभे ठाकले आहे. या सेवेसाठी बस पुरविणाऱ्या पुरवठादारांची तीन, चार महिन्यांची तब्बल ३५ कोटींची देयके थकलेली आहेत. त्यांनी देयके न मिळाल्यास सेवा थांबविण्याचा इशारा दिल्याचे सांगितले जाते.

दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने वाहकांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून सिटीलिंक बससेवा पूर्णत: ठप्प झाली होती. दररोज तब्बल एक लाख प्रवाश्यांची या बससेवेवर मदार असते. त्यात हजारो पासधारक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बस बंद झाल्याची सर्वाधिक झळ त्यांना बसली. बाहेरगावहून आलेले प्रवासी आणि स्थानिकांना रिक्षातून प्रवास करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. मनपा आयुक्त शहरात नसल्याने हा तिढा पहिल्या दिवशी सुटला नव्हता. बुधवारी पहाटेपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत प्रवाश्यांचे पहिल्या दिवशीसारखे हाल झाले.

आणखी वाचा-जळगाव: रावेर तालुक्यात मुसळधारेने दाणादाण, केळीसह इतर पिकांचे नुकसान

सिटीलिंक बससेवेत ५५० वाहक कंत्राटी पध्दतीने कार्यरत आहेत. दोन महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. वाहक पुरविण्याचा ठेका सिटीलिंकने मॅक्स नामक कंपनीला दिला असून ती राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित आहे. प्राप्त देयकानुसार ठेकेदाराला रक्कम दिली गेल्याचे सिटीलिंकने म्हटले होते. बस सेवा ठप्प झाल्यामुळे शहरात बिकट स्थिती निर्माण झाली. पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिका आयुक्त, संबंधित ठेकेदार, तसेच आंदोलकांच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरून चर्चा करत तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी सिटीलिंकचे प्रदिप चौधरी, बाजीराव माळी, महाव्यवस्थापक मिलींद बंड, मॅक्स डिटेक्टिव्ह ॲण्ड सिक्युरीटी सर्व्हिसेसचे प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चेअंती मॅक्स कंपनीने २१ जुलैपर्यंत थकीत वेतनाची रक्कम वाहकांना द्यावी. त्याबाबतची कागदपत्रे सात दिवसात सिटीलिंकला सादर करण्याचे निश्चित झाले. उशीरा गेलेल्या फेऱ्यांबाबत होणाऱ्या दंडात्मक आकारणीवर वाहकांचा आक्षेप आहे. या दंडाची गणना फेरीच्या नियोजित वेळेनुसार करण्यात येईल. चुकीने दंड आकारणी झाल्यास तो कमी करण्याची तयारी दर्शविली गेली. ३१ जुलैपूर्वी पडताळणीचे हे काम करण्यात येणार आहे. मॅक्स कंपनीने उपस्थित केलेल्या मुद्यांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे निश्चित झाले.

आणखी वाचा-नाशिक: सप्तश्रृंग गडाच्या दरीतून अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात यश

सेवा सुरू करण्यात कालापव्यय

बैठकीत तोडगा निघाल्यावर दुपारपासून बससेवा त्वरित सुरू करण्याचा निर्णय झाला होता. पण, सायंकाळी उशिरापर्यंत एकही बस रस्त्यावर धावत नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल झाले. मुक्कामी जाणाऱ्या ३२ बस तपोवन आणि नाशिकरोड आगारातून २७ बस सोडल्या जाणार असल्याचे सिटीलिंककडून सांगण्यात आले. तसेच पाच बस रात्री शहरात कार्यरत असतात. सायंकाळी उशिरा पहिली बस आगारातून बाहेर पडली. रडतखडत ही सेवा सुरू झाली. अनेक भागातील प्रवाशांना त्याचा उपयोग होऊ शकला नाही. गुरुवारपासून ही सेवा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याचा अंदाज आहे.

३५ कोटींचे देयक थकीत

सिटीलिंक सेवेसाठी सुमारे २५० बस दोन कंत्राटदार कंपन्यांनी पुरविल्या आहेत. त्यासाठी महापालिका प्रति किलोमीटर निश्चित दराने दर महिन्याला त्यांना पैसे देते. ही देयके मागील तीन, चार महिन्यांपासून दिली गेलेली नाहीत. थकबाकीची ही रक्कम सुमारे ३५ कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. देयके थकल्याने दैनंदिन इंधन, सीएनजी गॅस व चालकांचे वेतन या खर्चाचा भार पेलणे अवघड झाल्याकडे लक्ष वेधत पुरवठादारांनी बस सेवा थांबविण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात गुरुवारी महापालिकेत बैठक बोलाविण्यात आल्याचे सांगितले जाते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citylink bus provider likely to stop service due to non payment mrj
Show comments